अमरावतीत राष्ट्रवादीत संघर्ष, पक्ष सोडण्याची धमकी

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा संघर्ष इरेला पेटला आहे. अमरावतीची उमेदवारी आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांना दिली जाणार असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीतले निष्ठावान कार्यकर्ते पक्ष निरीक्षकांवरच भडकले. राणांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यास पक्ष सोडून देण्याची धमकी सरचिटणीस संजय खोडके यांनी दिलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 8, 2014, 09:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमरावती
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा संघर्ष इरेला पेटला आहे. अमरावतीची उमेदवारी आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांना दिली जाणार असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीतले निष्ठावान कार्यकर्ते पक्ष निरीक्षकांवरच भडकले. राणांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यास पक्ष सोडून देण्याची धमकी सरचिटणीस संजय खोडके यांनी दिलीय.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी आलेल्या राष्टवादीच्या पक्ष निरीक्षकांना कार्यकर्त्यांच्या रोषाला बळी पडावे लागले. आमदार रवी राणा यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष निरीक्षक अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी आपल्या समर्थकांसह राणांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत निवेदन दिलं.
मात्र हे निवेदन स्वीकारल्यामुळं राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांनी निरीक्षकांना चांगलंच फैलावर घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच राणांना उमेदवारी दिली तर पक्षाचं काम करणार नसल्याचा इशाराही खोडकेंनी दिलाय. तर उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील असं देशमुखांनी स्पष्ट केलंय.
अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. त्यामुळं आमदार रवी राणा य़ांनी आपल्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावलीय. तसंच स्थानिक पातळीवरील अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या बाजूनं वळवल्याची चर्चा आहे. मात्र खोडकेंनी खोडा घातल्यामुळं उमेदवारीचं नाट्य वाढलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा>