www.24taas.com, गोंदिया
गोंदियात धुमाकूळ घालणा-या नरभक्षक वाघाला ठार मारण्यात वनविभागाला यश आलंय. वनविभाग अधिका-यांनी केलेल्या दाव्यानुसार पाच महिलांचे बळी घेणा-या या वाघास गोळ्या घालण्यात आल्या आहेत.
या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी सी-60 च्या सशस्त्र जवानांसह 171 कर्मचाऱ्यांचे गेल्या 15 दिवसांपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं. अखेर शनिवारी 1 वाजून 20 मिनिटांनी सशस्त्र दलाच्या जवानांनी नऊ फैरी झाडून सिलेझरी येथे त्याला मारण्यात आलं. नैसर्गिक अन्न कमी झाल्यामुळेच हा वाघ नरभक्षक झाल्याचं सांगण्यात येतंय.
या वाघानं केलेल्या हल्ल्यात गेल्या काही दिवसांत 5 महिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत या वाघानं प्रचंड दहशत निर्माण केली होती. या वाघाला पक़डण्यासाठी चक्क म्हशींना साडी घालण्याची युक्तीही करण्यात आली होती. कारण वाघानं ठार मारलेल्या महिलांनीही भडक रंगाच्या साड्या नेसल्या होत्या.