www.24taas.com, झी मीडिया, जालना
जालना पालिकेच्या नियोजनाची दिवाळ-खोरी पुढे आली आहे. पथदिव्याचं 14 कोटींचं वीजबिल न भरल्यानं गेल्या ९ महिन्यांपासून लोकांचा प्रवास अंधारातच सुरु आहे. नागरिकांनी पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून पालिका बरखास्त करण्याची मागणीही केलीय.
दिवाळी तसा रोषणाईच सण...मात्र जालन्यात राहणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरून जाताना अंधारातून वाट काढत घर शोधावं लागणार आहे. नगरपालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे गेल्या ९ महिन्यांपासून रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. आणि त्याचा फटका जालण्यातील नागरिकांना बसलाय. नगरपालिकेने महावितरणाचं १४ कोटींचं वीज बिल न भरल्यानं त्यांनी पथदिव्याचा वीजपुरवठा खंडीत केलाय. त्यामुळे तिमिराकडून तेजाकडे नेणारा हा दीपोत्सव जालनेकरांसाठी अंधकारमय ठरलाय.
महावितरण कंपनीने वारंवार सुचना करून सुध्दा नगरपालिकेनं 14 कोटीचं वीजबिल भरल नाही. तसेच अभय योजनेतून वीजबिल भरण्याच्या सुचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र नगरपालिकेने त्यांच्या कारभारात सुधारणा केली नसून कामातील हलगर्जीपणा कायम ठेवला. त्यामुळे महावितरणाने 198 पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत केलाय.
रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्यानं महिलांनी रात्री घराबाहेर जाण टाळलंय. त्यामुळे संतप्त महिलांनी नगरपालिका बरखास्त करण्याची मागणी केलीय. दिवाळीच्या दिवसात रस्यांवरीही पथदिवे नगरपालिके सुरु करू शकत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. शहर विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा कर गोळा केला जाता तो निधी कुठे जाता असा सवाल आता विचारला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.