www.24taas.com, औरंगाबाद
आज सकाळी औरंगाबाद महापालिकेच्या इमारतीला अचानक आग लागली. या आगीमध्ये काही महत्त्वाची कागदपत्र जळाली आहेत. त्यामुळे आता या आगीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या आस्थापना विभागात सकाळी सातच्या सुमारास लागलेल्या आगीमागे संशयाचा धूर असल्याचा आरोप होतो आहे.
कर्मचारी घोटाळा लपवण्यासाठी आग लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.. या आगीत १०२४ कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका जळून खाक झाल्या आहेत. आगीत महापालिकेची अजूनही काही महत्वाची कागदपत्रं जळाल्याची भिती व्यक्त करण्यात येते आहे.
दरम्यान अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. महापालिकेच्या अस्थापना विभागात आग लागल्याची ही दुसरी वेळ आहे.. तर, महापालिकेच्या विविध विभागातही या पूर्वी शॉर्टसर्कीटमुळे तीन ते चार वेळा आग लागली होती.