www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
अभ्यास करणंही जिवावर बेतू शकतं हे औरंगाबादच्या एका घटनेवरून सिद्ध झालय. अभ्यास करत नसल्याची तक्रार केली म्हणून मावस भावानंच मावस भावाचा खून केल्याचं औरंगाबादेत समोर आलंय. या खूनाच्या प्रकरणानं औरंगाबाद हादरलय.. किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदनच्या शुभमनं १०वीमध्ये ९४ टक्के मार्क मिळवून इंजिनिअर होण्याच्या स्वप्नापोटी, औरंगाबादच्या देवगिरी कॉलेजमध्ये सायन्स मध्ये प्रवेश घेतला. आपल्या मावस भावासोबत शुभम सौजन्य नगर भागात एक रूम करुन रहायचा. अभ्यासात हुशार असलेला शुभम आपला संपूर्ण वेळ अभ्यासात घालवायचा.
मात्र त्याच्या सोबत राहणारा त्याचा मावस भाऊ किरणला बहुदा हे पटत नसावं, त्यातच शुभमने किरण अभ्यास करीत नसल्याची तक्रार त्याच्या पालकाला केली. किरणला याचा राग आला आणि याच रागाच्या भरात त्यानं शुभमचा गळा घोटून खून केला.
या घटनेनंतर किरण फरार आहे. मात्र ज्या पद्धतीने अभ्यासाच्या वादातून हा खून झालाय, त्यामुळे मुलांच्या मानसिकतेबाबत आणि वाढत्या गुन्हेगारी बाबत आता चिंता व्यक्त होतेय.
सातत्यानी दोन मुलांमध्ये होणारी तुलना टाळावी, असे आवाहन समाजशास्त्राचे अभ्यासक व्यक्त करतायत.. त्याचबरोबर पालकांनी मुलांच्या मानसिकतेत होणारे बदल तातडीने ओळखण्याची गरज आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा समजून पालकांनी सुद्धा आताच मानसिकतेत बदल करण्याची गरज या निमित्ताने व्यक्त होतेय..
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.