www.24taas.com, परभणी
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात दिनेश चौधरी या पत्रकारासह त्यांची पत्नीवर आणि मुलीवर अॅसिड हल्ला केला गेलाय. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केलीय. पूर्णा पोलिसांनी ही कारवाई केली. गुटखा साठ्याची बातमी प्रसारीत केल्यानं हा मंगळवारी रात्री उशिरा हा अॅसिड हल्ला झाला करण्यात आला होता.
अॅसिड हल्ल्याला बळी पडलेले पत्रकार दिनेश चौधरी आणि त्यांची पत्नी या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत. पूर्णामध्ये दिनेश चौधरी हे आनंदनगरी आणि सोलापूर तरुण भारतचे पत्रकार आहेत. पूर्णामधल्या त्यांच्या घरी रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं ‘दिनेश भैय्या, दरवाजा उघडा’ म्हणून आवाज दिला. दिनेश दाराजवळ येताच अर्धवट उघड्या दारातूनच त्यांच्यावर अॅसिड फेकण्यात आलं. त्यापाठोपाठ त्यांची पत्नी अरुणा आणि मुलगी रश्मीवरही अॅसिडचे थेंब उडाल्यानं त्याही गंभीर जखमी झाल्यात.
यासंदर्भात पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अली ऊर्फ डॉनसह यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आत्तापर्यंत या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आलंय. पत्रकार असलेल्या चौधरी यांनी अवैध गुटख्यासंदर्भात बातमी प्रसारित केल्यानं त्यांची आणि काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद अली यांची काही दिवसांपूर्वी बाचाबाची झाली होती. सय्यद अली यांनी चौधरी यांना धमकावलंही होतं. म्हणून हे कृत्य त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनीच केल्याचा संशय दिनेश यांनी दिलेल्या फिर्यादीत व्यक्त केलाय. विशेष म्हणजे हा प्रकार पूर्णा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडलाय.