www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
अजिंठामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ ७० हजार रुपयांसाठी पतीने स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
गुजरातमधील अरविंदभाई (३३) याला लग्न करायचे होते; परंतु गुजरातमध्ये मुलगी मिळत नव्हती. त्यामुळे त्याने शेख रशीद नावाच्या दलालाशी संपर्क साधला. ७० हजार रुपये दे, तुझे दोन दिवसांत लग्न लावून देतो, असे म्हणून रशीदने अरविंदभाईसोबत सौदा केला. अरविंदभाईने त्याला ४० हजार रुपये अँडव्हान्सही दिला. उरलेले ३० हजार रुपये लग्नानंतर देण्याचे ठरले.
बुलडाणा येथील विनोद सुभाष मोकळे (२६), हा आपली पत्नी अर्चना (२४) हिला घेऊन २० मे रोजी ठरल्याप्रमाणे अजिंठ्यात दाखल झाला. पती असलेला विनोद तिचा बनावट भाऊ बनला. नंतर रशीदच्या घरी अजिंठा येथे लग्नाचा साधा कार्यक्रम झाला. यावेळी अर्चना आणि अरविंदभाई एकमेकांच्या गळ्यात हार टाकून विवाहबंधनात अडकले.
पती असलेला विनोद अर्चनाचा भाऊ बनून त्याने पत्नीचे कन्यादानही केले. लग्नविधी आटोपल्यानंतर नवदाम्पत्याला जळगाव येथील रेल्वेस्टेशनवर सोडण्यासाठी दलाल घेऊन गेले. पण तेथून अर्चना आणि विनोदने पळून जाण्याचा घाट घातला. त्यानुसार अर्चना बाथरूमला जाते म्हणून पळ काढला. याचवेळी अरविंदभाईला संशय आला. त्यांने तात्काळ पोलिसांनी संपर्क केला. त्यानंतर त्यांचे भांडाफोड झाला.
रेल्वे पोलिसांच्या चौकशीनंतर खोटे लग्न लावून आपली फसवणूक झाल्याचे अरविंदभाईच्या लक्षात आले. जळगावचे येथ पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपी अर्चना विनोद मोकळे, विनोद सुभाष मोकळे (रा. बुलडाणा), दलाल शेख सलीम शेख अब्दुल (रा. भोकरदन जि. जालना), नसीब बच्चूभाई कुरेशी (रा. छावरकुंडला गुजरात) या चौघांना अटक केली.
अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर मुख्य सूत्रधार दलाल शेख रशीद शेख चंदू (३३), लताबाई सखाराम साळवे यांनाही अटक केली. यातील आरोपी अर्चना, विनोद, शेख सलीम, नसीब यांना आज सिल्लोड न्यायालयाने २५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.