नवी दिल्ली : प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा नवी दिल्लीत करण्यात आली आहे. २०१५ वर्षासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतले साहित्यिक अरुण खोपकर यांना घोषित झाला आहे.
चलत चित्रव्यूह या साहित्यकृतीसाठी, अरुण खोपकर यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. तर कोकणी भाषेतले साहित्यिक डॉक्टर उदय भेंब्रे यांची त्यांच्या ‘कर्ण पर्व’ या नाटकासाठी, साहित्य अकादमी पुरस्काराकरिता निवड झाली आहे. श्रीकांत बाहुलकर यांना भाषा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.
अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २३ भाषांसाठी हे पुरस्कार जाहीर केले. पुरस्कारप्राप्त पुस्तकांमध्ये सहा लघुकथासंग्रह, सहा कवितासंग्रह, चार कादंबऱ्या, दोन निबंधसंग्रह आणि एका आत्मवृत्ताचा समावेश आहे. सायरस मिस्त्री (इंग्रजी), के. आर. मीरा (मल्याळम), जसविंदर सिंग (पंजाबी) आणि मधू आचार्य ‘आशावादी’ (राजस्थानी) या कादंबरीकारांना त्यांच्या साहित्यकृतींबद्दल २०१५ साठीच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
कुला सैकिया (आसामी), मनमोहन झा (मैथिली), गुप्त प्रधान (नेपाळी), विभूती पटनायक (उडिया), माया राही (सिंधी) आणि व्होल्गा (तेलगू) यांना लघुकथांसाठी हा पुरस्कार मिळणार आहे. ब्रजेंद्रकुमार ब्रह्म (बोडो), ध्यानसिंग (डोगरी), रामदर्श मिश्रा (हिंदी), के. व्ही. तिरूमलेश (कन्नड), क्षेत्री राजन (मणिपुरी) आणि रामशंकर अवस्थी (संस्कृत) यांना कवितासंग्रहांसाठी गौरविण्यात येईल.
सन्मानचिन्ह, शाल व एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बहुलकर यांना अकादमीच्या अध्यक्षांच्या हस्ते एका विशेष समारंभात सन्मान प्रदान करण्यात येईल. पुरस्कारप्राप्त युवा साहित्यिकांना मागील महिन्यात मुंबईत झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले होते.