www.24taas.com, पुणे
पुणेरी ढोल ताशाची भुरळ पडणार नाही असा कोणी शोधून सापडणार नाही. पुणेरी ढोल ताशाची ख्याती सर्वश्रुत आहे. त्यातच हे पथक अजय अतुल या दिग्गज संगीतकारांचं. सध्या पुण्यात वादकांची मोठी गर्दी झाली आहे. अनेक ढोल पथकं ही अजय-अतुल यांच्या ढोल पथकात सामील होण्यासाठी धडपडत आहेत.
ढोल जनरेशन या अस्सल मराठमोळ्या आणि रांगड्या ढोल पथकाची घोषणा या जोडीनं केली होती. मराठी संगीताला एका उंचीवर नेऊन ठेवल्यानंतर ढोल ताशाला आतंरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्याच्या उद्देशानं या पथकाची स्थापना केली आहे. या पथकात सामील होण्यासाठी पुण्याच्या सिद्धी गार्डनमध्ये ऑडिशन्स सुरु आहेत.
आतापर्यंत ४ हजाराहून अधिक तरुण-तरुणींनी ऑडिशन्स दिल्या आहेत. याच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून तिसरी फेरी जूनमध्ये होणार आहे. खुद्द अजय अतुल या वादकांची पात्रता तपासत आहेत. या पथकामध्ये सामील होण्यासाठी वादकांमध्ये जल्लोष पाहायला मिळतो आहे.