www.24taas.com, झी मीडिया, सातारा
पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकोबांची पालखी आणि सोपान काकांची पालखीचं रिंगण एकाच ठिकणी म्हणजे बाजीराव विहीर परिसरात रंगलं. या सोहळा `याचि देही याचि डोळा` पाहणाऱ्या भाविकांनी डोळ्यांचं पारणं फिटल्याची भावना व्यक्त केलीय.
ज्ञानोबांच्या पालखीचं शेवटचं गोल रिंगण
भंडीशेगावमधील मुक्काम आटोपून दूपारी वाखरीकडे निघालेल्या माऊलींच्या पालखीचं उभं आणि गोल रिंगणाकरता बाजीराव विहीर परिसरात आगमन झालं आणि संपूर्ण परिसर फुलून गेला. माऊली पालखीच्या चोपदारांनी रस्त्यावर रिंगण लावून घेतल्यानंतर पालखी सोहळ्याच्या अग्रभागी असलेला माऊली आणि पालखीच्या स्वाराचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. या अश्वानं माऊलीला उजवी प्रदक्षिणा घालून मागे २० दिंड्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर पुन्हा दौडत येऊन त्याने माऊलींचे दर्शन घेतले. या सोहळ्यावेळी लाखो भाविकांनी माऊली माऊली नामाचा जयघोष केला. उभ्या रिंगणानंतर माऊलींची पालखी रथातून उतरवण्यात आली. पालखी खांद्यावर घेऊन गोल रिंगणासाठी शेजारच्या शेतात नेण्यात आली...
पालखी सोहळ्यातील अखेरचं गोल रिंगण रंगणार असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने आधीच प्रचंड गर्दी केली होती. टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी रिंगणाच्या मध्यभागी आणली गेली. त्यानंतर रिंगणाला सुरूवात झाली. पुढे स्वाराचा तर मागे माऊलींचा अश्व वायुवेगाने धावला. अश्वांनी नेत्रदीपक दौड पूर्ण केली आणि भाविकांनी अश्वाच्या टापाखालील माती भाळी लावण्यासाठी एकच गर्दी केली. रिंगण सोहळ्यानंतर माऊलींच्या पालखीचा मुक्काम वाखरीत असणार असून त्यानंतर पालखी दुपारी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. उद्या (गुरुवारी) पालखीचं शेवटचं उभं रिंगण पार पडणार आहे.
तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण
माऊलींच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर तुकाराम महाराजाच्या पालखी सोहळ्यातील उभं रिंगण बाजीरावची विहीर येथे रंगलं. पंढरपूरपासून मोजक्याच अंतरावर असणाऱ्या तुकोबांच्या या रिंगण सोहळ्याकरता वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आधी पताकाधारी, त्यानंतर डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला वारकरी, पखवाजवादक आणि वीणाधारी यांनी रिंगणात फेरी पूर्ण केली. त्यानंतर चोपदाराचा अश्व आणि तुकोबांचा अश्व यांनी रिंगण वेगात पूर्ण केलं आणि अश्वांच्या खूरांनी पावन झालेली धूळ मस्तकी लावण्याकरता वारकऱ्यांचा महापूर रिंगणात लोटला. बाजीराव विहीरीजवळ तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण झाल्यानंतर संत ज्ञानदेव, संत तुकाराम आदि संतांचे पालखी सोहळे संध्याकाळी वाखरी मुक्कामी विसावणार आहेत. माऊलींच्या पालखीचाही वाखरीत मुक्काम असल्याने तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्या एकमेकांना भेटणार आहेत. दरवर्षीप्रमाणे वाखरी येथे सकाळी संतांच्या पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे.
सोपान काकांच्या पालखीचं उभं रिंगण
माऊलींच्या रिंगण सोहळ्यापूर्वी बाजीरावची विहीर परिसरात ज्ञानोबांचे संतबंधू अशी ओळख असणाऱ्या संत सोपान काकांच्या पालखीचा उभा रिंगण सोहळा रंगला. या सोहळ्याला वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आधी चोपदारांनी रस्त्यातच उभं रिंगण लावल्यानंतर चोपदारांनी अश्वाला धरून नेत पालखीचं दर्शन घडवलं. त्यानंतर अश्वाने वेगाने धावत रिंगण पूर्ण केल्यानंतर वारकऱ्यांनी धूळ मस्तकी लावली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.