www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.
माऊलींची पालखी...
रविवारी माऊलींच्या पालखीचा पहिला गोल रिंगणाचा सोहळा रंगला तो सदाशिवनगरच्या शंकर कारखाना मैदानावर... माऊलींच्या पालखीचं हे पहिलंच गोल रिंगण असल्याने वारकरी प्रचंड उत्साहात होते. हातात भगव्या पताका, टाळृ-मृदुंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने सारा रिंगण परिसर दुमदुमून गेला.
नातेपुते येथील मुक्काम आटोपल्यानंतर रविवारी माऊलींच्या पालखीने मांडवी ओढा येथे दुपारी जेवणाचा विसावा घेतल्यानंतर सदाशिवनगर येथे पहिल्या रिंगणाचा मार्ग धरला. माऊलींची पालखी रिंगण मैदानात आल्यानंतर पाठोपाठ रथापुढील आणि मागील दिंड्या मैदानात दाखल झाल्या. यावेळी चोपदारांनी रिंगण लावून माऊलींच्या अश्वाला धरून मैदानातून फेरी मारली.
तुकोबांची पालखी...
रविवारी तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अकलूज येथील गोल रिंगणाचा कार्यक्रम माने विद्यालयाच्या प्रांगणावर मोठ्या उत्साहात पार पडला. तुकोबांच्या पादुकांचं नीरास्नान झाल्यानंतर पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं.
दरम्यान, पालखी मैदानात येताच पुष्पवृष्टी करून पालखीचं स्वागत झालं. रिंगणात सर्वप्रथम तुळस आणि पाण्याची घागर घेतलेल्या महिला, झेंडेकरी, पखवाज वादक व टाळकरी धावले. त्यानंतर चोपदारांचा अश्व आणि मानाचा अश्व रिंगणात धावले... आणि अश्वाच्या पायाची धूळ चरणी लावण्याकरता वारकऱ्यांमध्ये एकच झुंबड उडाली. रिंगणादरम्यान वारकऱ्यांनी अखंड विठ्ठलनामाचा धावा केला. त्यामुळे रिंगण सोहळा टिपेला पोहचला. रिंगण सोहळा आटोपल्यानंतर माळीनगर येथे पालखीनं दुपारचा मुक्काम घेतल्यानंतर तुकोबांची पालखी संध्याकाळी बोरगांवकरता मुक्कामाला होती. आज माळशिरला पालखीचा उभा रिंगण सोहळा रंगणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.