अजितदादांचा राजीनामा ही तर नौटंकी - राज ठाकरे

`अजित पवारांचा राजीनामा ही तर नौटंकी आहे.` असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

Updated: Sep 25, 2012, 07:39 PM IST

www.24taas.com, मुंबई
`अजित पवारांचा राजीनामा ही तर नौटंकी आहे.` असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील द्ंवद्व हे कायमच दिसून येतं. मात्र अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याबाबत दिलेला राजीनामा ही एक नौटंकी आहे असं राज ठाकरे यांनी म्हटंल आहे.
जलसंपदा विभागात घोटाळा झाल्याचे आरोप मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आरोपातून मुक्त होईलपर्यंत पदमुक्त राहील अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. या दरम्यान पक्षाचे काम करीत राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जलसंपदामंत्री असताना तीन महिन्यांत सर्व नियम डावलून २० हजार कोटींच्या निधीचं वाटप केल्याचा विरोधकांचा आरोप होता. राजीनामा दिल्यानंतर अर्थमंत्रीपद जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात यावं, उर्जा मंत्रालय राजेश टोपेंकडे सोपवण्यात यावं असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.
आरोपमुक्त होईपर्यत मंत्रीपद स्वीकारणार नाही असा पवित्रा घेत अजित पवारांनी मी सगळी पदे सोडली आहेत, हवी ती कारवाई करण्यास मोकळे आहेत, असेही यावेळी सांगितले. कोणीही कितीही चांगली कामगिरी केली तरीही कधीही असं वातावरण निर्माण केलं जातं की हा माणूस चांगल काम करीतच नाही, जो अधिकार मला होता, तो मी वापरला, मी कुठे चुकलो असेल असे वाटत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मी सत्तेत आहे म्हणून लोक म्हणतील कारवाई होत नाही. मात्र त्यामुळेच मी सगळी पदे सोडली आहेत. माझी काम करण्याची पद्धत अशीच आहे. या पुढे आता पक्षाचं काम करतंच राहणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.