www.24taas.com, नवी दिल्ली
कॅन्सरशी संघर्ष दिल्यानंतर युवराज सिंग प्रथमच मीडियासमोर आला. पत्रकारांशी बोलताना आपला कँसरशी दिलेला लढा त्याने शब्दांत मांडला. कॅन्सर झालाय़ यावर विश्वासच बसला नव्हता असं युवी म्हणाला. तसंच उपाचारदरम्यान आईकडून ताकद मिळली तर लान्स आर्मस्ट्राँगकडून प्रेरणा मिळाली असल्याचं त्यानं सांगितलं. केमोथेरपीच्या तीनही सेशन्सच्या वेळी आई सोबत असल्याचं युवराजने सांगितलं.
सचिनच्या १००व्या शतकाचा मैदानावर साक्षीदार होऊ शकलो नाही, या गोष्टीची खंत युवराजने व्यक्त केली. आयपीएलमध्येही सहभागी होऊ न शकल्याचं दुःख युवराजने बोलून दाखवलं. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा भारतासाठी खेळण्यासाठी आतूर असल्याचही त्यानं म्हटलं आहे.
युवराजला त्याच्या या गंभीर आजाराबाबत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कळालं. मात्र गेली तीन वर्ष युवराजला या आजारानं विळखा घातला होता. २००९ मध्ये पहिल्यांदा युवराजला खोकल्यानं त्रस्त केलं.प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात, मात्र काही वेळा परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की माणूस परिस्थितीसमोर हतबल होतो. मात्र अशा परिस्थितीवर जो मात करतो त्यालाच चॅम्पियन म्हणतात आणि हीच विजीगिषु वृत्ती बाळगल्यामुळे युवी कँसरवर मात करून उभा राहिला आहे. माझ्यावरून जर कुणी प्रेरणा घेऊ शकलं, तर मला त्यात आनंदच आहे, असं युवराजने सांगितलं