www.24taas.com, नवी दिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याच्या प्रकरणात पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी बंगळुरूचा संघ दबाव टाकत असल्याचे अमेरिकन महिलेने सांगितले आहे. असे केले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप या अमेरिकन महिलेने केला आहे.
पॉर्मसबॅचला पोलिसांना अटक केल्यानंतर आयपीएलच्या बंगळुरू संघाकडून मला धमकी देण्यात आल्याचे अमेरिकन महिलेने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्यामुळे आता माझ्या जीविताला धोका असल्याचे त्या महिलेने सांगितले आहे.
ल्यूकने केलेल्या प्रकाराबद्दल त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडित महिलेलने केली आहे.
दरम्यान, यापूर्वी ल्यूक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची केल्याचा तक्रार दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. विकेटकीपर असणा-या पॉमर्सबॅचने आयपीएलमध्ये याआधी किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
राजधानी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात थांबलेल्या या महिलेने आणि तिच्या भावी पतीने बंगळुरुचा खेळाडू ल्यूक पॉमर्सबॅच याला आपल्या खोलीत बोलावले होते. त्यानंतर महिलेने आरोप केला आहे की, या खेळाडूने माझ्याशी गैरवर्तन करुन अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. याला जेव्हा माझ्या भावी पतीने विरोध केला तेव्हा त्या खेळाडूने त्यालाही मारहाण केली. तक्रार करणारी महिला आणि तिचा भावी पती एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहेत. तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचे या महिलेने म्हटले आहे.