दिंडाने उडवली मुंबईची दांडी!

पहिल्या सामन्यात चेन्नईला धूळ चारणाऱ्या मुंबई इंडियन्सला पुणे वॉरियर्सने त्यांच्या भूमीत पाणी पाजले. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्‍यामुळे मुंबई इंडियन्‍स २९ धावांनी पराभव पत्‍कारावा लागला. अशोक दिंडाची चमकदार कामगिरीमुळे पुण्याचा विजय सूकर झाला.

Updated: Apr 6, 2012, 09:00 PM IST

www.24taas.com , मुंबई

 

पहिल्या सामन्यात चेन्नईला धूळ चारणाऱ्या मुंबई इंडियन्सला पुणे वॉरियर्सने त्यांच्या भूमीत पाणी पाजले.  आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्‍यामुळे मुंबई इंडियन्‍स २९ धावांनी पराभव पत्‍कारावा लागला. अशोक दिंडाची चमकदार कामगिरीमुळे पुण्याचा विजय सूकर झाला. त्‍याने ४ षटकांमध्‍ये १७ धावा देऊन ४ फलंदाजांना तंबूत पाठविले.

 

या सामन्यात सौरव गांगुलीने पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची झलक दाखविली. सुरूवातीलाच स्पिनर्सला गोलंदाजी देऊन त्याने आपला अनुभव सिद्ध केला. पहिलेच षटक  मुरली कार्तिकला देऊन त्यांच्या विजयातील अडसर असलेला लेव्ही दूर केला.

 

धोकादायक पोलार्डपाठोपाठ जेम्‍स फ्रँकलिन आणि मलिंगा तंबूत परतले. त्‍याचवेळी मुंबईचा पराभव निश्चित झाला होता. राहुल शर्माने पोलार्डचा त्रिफळा उडविला. त्‍यावेळी मुंबईला अखेरच्‍या ४ षटकांमध्‍ये विजयासाठी ५३ धावांची गरज होती. परंतु, पुण्‍याच्‍या गोलंदाजांनी कोणतीही संधी दिली नाही.

 

मुंबईची आघाडीची फळी कोसळली. सुर्यकुमार यादवचा मार्लन सॅम्‍युअल्‍सने त्रिफळा उडविला. तर त्‍यापुर्वी दिनेश कार्तिकही बाद झाला. त्‍याने ३२ धावा काढल्‍या. दुस-या षटकामध्‍येच ५ धावांवर ३ फलंदाज तंबूत परतले होते. त्‍यानंतर दिनेश कार्तिकने जेम्‍स फ्रँकलिनच्‍या साथीने डाव सावरला. रोहित शर्माही झटपट बाद झाला. अशोक दिंडाच्‍या गोलंदाजीवर उथप्‍पाने त्‍याचा झेल घेतला. रोहित फक्त 1 धाव काढून बाद झाला. सलामीवीर रिचर्ड लेव्‍ही आणि अंबाती रायुडूदेखील झटपट बाद झालेत. लेव्‍ही डावाच्‍या दुस-याच चेंडुवर बाद झाला. गांगुलीने मुरली कार्तिकला नवा चेंडु दिला. त्‍याच्‍या उजव्‍या यष्‍टीबाहेर वळणा-या चेंडुवर लेव्‍ही चकला आणि उथप्‍पाने त्‍याला शिताफीने यष्टिचित केले. तर रायुडू दुस-या षटकाच्‍या दुस-या चेंडुवर बाद झाला. अशोक दिंडाने त्‍याची विकेट घेतली.

दादा सौरभ गांगुलीच्या पुणे वॉरियर्सने मुंबई इंडियन्‍सला विजयासाठी १३० रन्सचे टार्गेट दिले होते.  दरम्यान, आजच्‍या सामन्‍यात सचिन तेंडुलकरचा मुंबई संघात समावेश नाही. त्‍याच्‍याऐवजी सूर्यप्रताप यादवला संधी देण्‍यात आली आहे.

 

 

पुणे वॉरियर्सने २०  षटकांमध्‍ये ९ बाद १२९ रन्स केल्या. पुण्‍याचा डाव  कोसळला  असताना रॉबिन उथप्‍पाने एक बाजू लावून धरली होती. मात्र, रॉबिन उथप्‍पापाठोपाठ मार्लन सॅम्‍युअल्‍सही बाद झाला. मलिंगाने त्‍याचा त्रिफळा उडविला. उथप्‍पा ३६ रन्स काढून बाद झाला. तर सॅम्‍युअल्‍सने अवघ्‍या ४  रन्स काढल्‍या. त्‍यानंतर स्‍टीव्‍ह स्मिथने फटकेबाजी केली. त्‍याने ३९ रन्स काढल्‍या. अखेरच्‍या षटकांमध्‍ये मुरली कार्तिकने एक षटकार आणि एक चौकार ठोकून संघाच्‍या धावसंख्‍येत भर घातली. मलिंगाने ४ षटकांमध्‍ये १६ रन्स देत दोन फलंदाजांना बाद केले. तर मुनाफ पटेलने २६ रन्समध्‍ये दोन  विकेट घेतल्या.

 

पुणे वॉरियर्सला सुरुवातीलाच ४  झटपट धक्‍के बसले. कॅलम फग्‍युर्सन १२  रन्स काढून धावबाद झाला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्‍यानंतर मुंबई इंडियन्‍सने पुणे वॉरियर्सला सुरुवातीलाच तीन धक्‍के दिले. सलामीवीर मनीष पांडे आणि सौरव गांगुली ही जोडी झटपट तंबूत परतली. त्‍यानंतर मुनाफ पटेलने वेन पार्नेलचा त्रिफळा उडवून तिसरा धक्‍का दिला. मनीष पांडेचा मलिंगाने त्रिफळा उडविला. तर सौरव गांगुलीला हरभजनने यष्टिचित केले.