वृषाली देशपांडे, www.24taas.com,मुंबई
वर्षभरापासून सचिनला सेंच्युरींची सेंच्युरी झळकावण्यात अपयश आलं आहे. यामुळे क्रिकेटविश्वातून त्याच्यावर जोरदार टीकाही होत आहे. असं असलं तरी, त्याचा गेल्या टेस्ट सीझनमधील ऍव्हरेज चांगला आहे. त्याचप्रमाणे भारताकडून २०११ सीझनमध्ये टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या भारतीय प्लेअर्समध्ये त्याचा नंबर टॉपवर असलेल्या विराट कोहलीनंतर लागतोय.
सचिन रमेश तेंडुलकर टीम इंडियाची रनमिशिन. क्रिकेटमधील बॅटिंगचे जवळपास सारेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. मात्र, गेल्या सीझनमध्ये त्याला महासेंच्युरीनं हुलकावणी दिली. १२ मार्च २०११ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये त्यानं आपली ९९ वी सेंच्युरी ठोकली होती. या सेंच्युरीनंतर सेंच्युरींच्या सेंच्युरीच्या प्रतीक्षेत तो अजूनही आहे. एक वर्ष उलटूनही त्याला महासेंच्युरी पूर्ण करता आलेली नाही. प्रत्येक मॅचमधून सचिनकडून असलेली सेंच्युरीची अपेक्षा आणि आता महासेंच्युरीचा दबाब सचिनवर असल्याची चर्चाही सुरु झाली आहे.
तब्बल २२ वर्षांपासून सचिन या क्रिकेटप्रेमींचं अपेक्षांचा ओझ घेऊन मैदानात उतरतोय. आणि त्यांच्या अपेक्षाही वेळोवेळी पूर्ण करतोय. मात्र, यावेळी त्याच्या महासेंच्युरीची वाट चाहत्यांना थोडी जास्तच पाहावी लागतेय. सचिनवर दबाव असला तरी त्याची वर्षभरातील कामगिरी त्याचा फॉर्म खराब नसल्याचचं दाखवतंय. त्यानं मॅचमध्ये चांगली सुरुवात केली. मात्र, त्याला याच रुपांतर मोठ्या इनिंगमध्ये करण्यात अपयश आलं.
सचिन तेंडुलकरनं ११ मॅचेसमध्ये ३७.०४ च्या सरासरीनं ७७८ रन्स केले आहेत. इंग्लंडविरुद्ध खेळलेली ९४ रन्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग ठरली आहे. अवघ्या ६ रन्सनी त्याला महासेंच्युरीनं हुलकावणी दिली होती. टेस्टमध्ये त्याची कामगिरी चांगली झाली. मात्र, वन-डे मध्ये त्याची बॅट फारशी तळपली नाही. ११ वन-डेमध्ये त्याला ३०१ रन्सच करता आल्या. पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये त्यानं ८५ रन्सची सर्वोत्तम इनिगं खेळली होती. या इनिंगमुळेच भारतानं वर्ल्ड कप फायनल गाठली होती.
सचिनला सेंच्युरी पूर्ण करता आली नसल्यानं क्रिकेट पंडितांनी त्याच्यावर टीकेची झोड उडवली आहे. त्यांनी सचिनला रिटायरमेंटचा सल्लाही देऊन टाकला आहे. मात्र, वर्षाभरातील त्याची कामगिरी पाहाता त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उभं केलंच जाऊ शकत नाही. आता, एशिया कपमध्ये सचिनचं महासेंच्युरीचं स्वप्न पूर्ण होईल अशी प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत.