आर. अश्विनची जादू संपली का?

रविचंद्रन अश्विन या भारतीय ऑफ स्पिनरचं टीम इंडियातील पदार्पण तसं प्रॉमिसिंग होतं. कॅरम बॉल, आर्म बॉल आणि ऑफ ब्रेकवर हुकूमत गाजवणा-या अश्विनने भारतीय खेळपट्टयांवरही आपल्या स्पिनची जादू दाखवली. पण प्रत्यक्षात भारतीय उपखंडाबाहेर मात्र अश्विनचा भेदक स्पिन अटॅक बोथट ठरला.

Updated: Mar 31, 2012, 11:48 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

रविचंद्रन अश्विन या भारतीय ऑफ स्पिनरचं टीम इंडियातील पदार्पण तसं प्रॉमिसिंग होतं. कॅरम बॉल, आर्म बॉल आणि ऑफ ब्रेकवर हुकूमत गाजवणा-या अश्विनने भारतीय खेळपट्टयांवरही आपल्या स्पिनची जादू दाखवली. पण प्रत्यक्षात भारतीय उपखंडाबाहेर मात्र अश्विनचा भेदक स्पिन अटॅक बोथट ठरला.  आणि विश्वविजयाच्या निर्धाराने घोडदौड करण्या-या टीम इंडियाच्या आशांना अश्विनच्या रूपाने सुरूंग लागला.

 

आर. अश्विनने स्वत:ची उंची आणि अंगभुत स्पिन कौशल्याच्या जोरावर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला.  लंकन स्पिनर अजंथा मेंडीसच्या कॅरम बॉल शैलीपासून प्रेरणा घेणा-या अश्विननेही स्वत:ची शैली डेव्हलेप करत कॅरम बॉलचा उपयुक्त वापर केला.  श्रीलंकेविरूद्ध हरारे वन-डेतून टीम इंडियात स्थान मिळवणा-या अश्विनने आपल्या भेदक बॉलिंगने छाप पाडली. त्याने प्रत्येक वन-डेगणिक आपल्या परफॉर्मन्समध्ये सातत्याने सुधारणा केली.  आऊट ऑफ फॉर्म हरभजन सिंगची टीममधील जागा सांभाळायला अश्विनने सुरूवात केली.  न्यूझीलंडला भारतात व्हाईटवॉश देण्यात अश्विनने मोलाची भुमिका बजावली. आणि त्याची 2011 वर्ल्ड कप करता भारतीय स्क्वॉडमध्ये वर्णी लागली.

 

भारतात खेळलेल्या 17 वन-डे मॅचेसमध्ये 25.53 च्या सरासरीने आपल्या भेदक मा-याच्या जोरावर 30 विकेट्स घेतल्या. आणि ही कामगिरी करताना अश्विनने न्यूझीलंडविरूद्ध चेन्नई वन-डेत 24 रन्समध्ये 3 विकेट्स घेत आपल्या सर्वोत्तम कामिगिरीची नोंद केली.

 

भारतीय उपखंडात झालेल्या वन-डेमध्ये तिखट मारा करणार अश्विन भारतीय उपखंडाबाहेर साफ उघडा पडला. आपल्या स्पिनच्या तालावर प्रतिस्पर्धी बॅट्समन्सना नाचवणा-या अश्विनची  भारताबाहेर नाचता येईना अंगण वाकडे स्थिती झाली.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात खेळलेल्या 11 वन-डेमध्ये अश्विन महागडा ठरला. त्याला 54.50 एवढ्या सरासरीने केवळ आठच विकेट्स घेता आल्या. आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी होती ती 40 रन्समध्ये घेतलेल्या 3 विकेट्स..

 

टेस्ट क्रिकेटमध्येही अश्विनची परिस्थिती सारखीच होती.  मायदेशात वन-डे क्रिकेटमध्ये आपल्या बॉलिंगची चुणूक दाखवणा-या अश्विनची वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट सीरिजकरता निवड झाली.  आणि त्याने डेब्यु टेस्टमध्येच विंडिजच्या 9 विकेट्स घेत त्याने आपली निवड सार्थ ठरवली. अश्विनने पदार्पणातच मॅन ऑफ मॅचचाही पुरस्कार पटकावला.

 

विंडीजविरूद्ध मायदेशात झालेल्या 3 टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये अश्विनने हरभजनची उणीव जाणवू न देता 22.90 च्या सरासरीने 22 विकेट्स घेतल्या.

 

मायदेशात स्पिन अटॅकने विंडिजची टेस्ट घेणा-या अश्विनच्या बॉलिंगमधली कांगारूंनी हवाच काढून टाकली.  ऑसी बॅट्समन्सनी अश्विनला लक्षं करून त्याची दे माय धरणी ठाय अशी स्थिती केली.  त्याला एकेका विकेटसाठी ऑस्ट्रेलियात झगडावं लागत होतं.

 

रणरणत्या  वाळवंटात एखादा पथीक पाण्यासाठी कासावीस व्हावा तशीच गत अश्विनची ऑस्ट्रेलियात होती. त्याला केवळ 3 टेस्टमध्ये 9 विकेट्स घेता आल्या. .81 रन्समध्ये 3 विकेट्स घेणा-या अश्विनला 62.77 च्या सरारीने कांगारूंनी चांगलाच मार दिला.

 

त्यामुळे भारतीय उपखंडात आपल्या स्पिनची आग ओकणारे स्पिनर्स भारताबाहेर आग विझवणा-या बंबाचीही भुमिका पार पाडू शकत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. तशातच द.आफ्रिकेत झालेल्या एकमेव टी-20मध्येही आफ्रिकन बॅट्समन्सनी अश्विनकडून सांबा डांस करून घेण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे आता भारतीय टीम आणि मॅनेजमेंटला पुन्हा एकदा टीममधील स्पिन अटॅककडे लक्षं द्यावं लागणार एवढं निश्चित.