www.24taas.com, हैदराबाद
आयपीएल ५ मध्ये रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान संपुष्ठात आलं. आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये डेक्कन चार्जर्सनं बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सला ९ रन्सनं मात दिली आणि प्लेऑफमध्ये पोहचण्याचं बंगळुरुचं स्वप्न धुळीला मिळालं. चॅलेंजर्सच्या पराभवानंतर चेन्नई सुपरकिंगची प्ले ऑफमधली जागा निश्चित झालीय.
बंगळुरूचा प्रवास ५व्या स्थानावर संपला तर आजच्या विजयानंतर डेक्कन चार्जर्सला एकूण ९ गुण मिळाले आहेत. आठव्या स्थानावर त्यांचाही प्रवास संपतोय. प्लेऑफ सामन्यांमध्ये आता दिल्ली डेअरडेविल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यामध्ये सामने रंगतील. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आजची मॅच जिकणं बंगळुरूसाठी आवश्यक होतं.
बंगळुरूनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला होता. डेक्कन चार्जर्सच्या वतीनं जे. पी. ड्युमिनीनं ७४, पार्थिव पटेलनं १६, संगकारानं १५ रन्स दिले. १३२ रन्सवर डेक्कन चार्जर्सला थांबावं लागलं. बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या वतीनं कॅप्टन विराट कोहलीनं ४२, सौरव तिवारीनं ३०, गेलनं २७ धावा दिल्या. पण, इतरांची मात्र त्यांना म्हणावी अशी साथ मिळाली नाही. डेक्कनने दिलेल्या १३३ रन्सचं आव्हान पेलताना बंगळुरुने २० षटकात ९ बाद १२२ धावा केल्या. बंगळुरूच्या झहीर खान, मुरलीधरन आणि परमेश्वरनला भोपळाही फोडता आला नाही. डेक्कनच्या डेलनं ३ विकेट घेतल्या. त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून घोषित करण्यात आलं.
दोन्ही टीम्सची ही लीग स्तरावरची शेवटची मॅच होती. रॉयल चॅलेंजर्सनं १६ मॅच मध्ये १७ गुण प्राप्त केले आणि पॉईंट टेबलवर पाचवं आपलं स्थान कायम ठेवलं. पॉईंटटेबलवर चॅलेंजर्सच्या अगोदर चेन्नई सुपरकिंग्स आहे.