www.24taas.com, नवी दिल्ली
भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी आयपीएलच्या विरोधात आज एक दिवसाचं उपोषण केलं. आयपीएलमध्ये काळ्या पैशाचा वापर होत असल्याचा आरोप आझाद यांनी केला आहे. या प्रकऱणी संसदेत संपूर्ण दिवस चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. जवळपास ८० वर्षांपूर्वी भारतानं क्रिकेटमध्ये पाऊल तेव्हा या खेळाची ही दशा होईल असा विचारही कुणी केला नसेल. विविध प्रकारचे आरोप क्रिकेटवर होतात.
आयपीएलच्या नव्या नव्या सुरस कथा रोजचं बाहेर येतात. मात्र या खेळाचं नियमन करणारे मात्र काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळं आता खासदारांनीच क्रिकेटमधल्या गैरकृत्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. आयपीएलमध्ये होत असलेले फिक्सिंगचे आरोप, छेडछाड, काळा पैसा या सगळ्या विरोधात भाजप खासदार आणि माजी कसोटीपटू किर्ती आझाद यांनी उपोषण केलं.
चार माजी क्रिकेटपटू आणि काही उदयोन्मुख क्रिकेटपटूंबरोबर किर्ती आझाद यांनी उपोषण केलं. आयपीएल हा पैशाचा खेळ आहे. क्रिकेटचं बाजारीकरण होत असताना जंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळातल्या अपप्रवृत्तीवर कारवाई का होत नाही हा प्रश्न आहे. छेडछाड असो की फिक्सिंग असो यामुळे क्रिकेटचं नुकसान होतं आहे. काळाच्या ओघात या घटना विसरल्या जातील की या खेळाचं नियमन करणारे काही कारवाई करतील काय असा प्रश्न आहे. नाही तर राजकीय चढाओढीत हा विषय बाजूला पडण्याचा धोका आहे.