www.24taas.com, लंडन
पाचवेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या व्हिनस विल्यम्सवर पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. रशियाच्या एलिना वेसनिनाने ३२ वर्षीय व्हिनसला ६-१ , ६-३ असे सहज नमविले. १९९७ मध्ये विम्बल्डन पदार्पण करणाऱ्या व्हिनसला पंधरा वर्षांत प्रथमच पहिल्या फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे.
दुसरीकडे तिसऱ्या सीडेड अग्नेस्का रॅदवाँस्का आणि ग्रँडस्लॅम जेतेपद विजेत्या सॅमन्था स्तोसूर व लि ना यांनी सोमवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. दोनवेळा उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या रॅदवाँस्काने स्लोवाकियाच्या मगदालेना रायबरिकोवाला ६-३ , ६-३ असे सहज हरवले.
२०११मध्ये अमेरिकन ओपन जिंकणाऱ्या सॅमन्था स्तोसूरने स्पेनच्या कार्ला सॉरेझ नवारोला ६-१ , ६-३ असे नमविले. सॅमन्थाला गेल्या दोन वर्षांत विम्बल्डनमध्ये साजेशी कामगिरी करता आली नव्हती. गेल्या दोन वर्षांत ती येथे सलामीलाच गारद झाली होती. विम्बल्डनमध्ये तिला फारफार तर तिसऱ्या फेरीपर्यंतच मजल मारता आली आहे. यंदा स्तोसूर कशी कामगिरी करते हे बघायचे. सोमवारी मात्र स्तोसूरने सॉरेझला फारशी संधीच दिली नाही. संपूर्ण सामन्यात तिचेच वर्चस्व होते.
पहिल्याच दिवशी फ्लॅविया पेनेत्ताच्या निमित्ताने सीडेड खेळाडूला गाशा गुंडाळावा लागला. इटलीच्या कॅमिला गिओर्गीने १६व्या सीडेड पेनेत्ताला ६-४ , ६-३ असे नमवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
जोकोविच दुसऱ्या फेरीत
अव्वल सीडेड नोवॅक जोकोविचने विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. या गतविजेत्या सर्बियन खेळाडूने स्पेनच्या ज्युआन कार्लोस फेरेरोवर ६-३ , ६-३ , ६-१ अशी सहज मात केली.