सावधान नेटकऱ्यांनो!! ८ मार्चपासून इंटरनेट बंद

८ मार्चपासून तुमची इंटरनेट सिस्टीम अचानक बंद पडू शकते. डोमेन नेम सिस्टीम चेंजर या व्हायरसची बाधा झाल्यामुळे जगभरातील लक्षावधी युजर्सना ही समस्या भेडसावू शकते. २००७ मध्ये डोमेन नेम सिस्टीम चेंजर या व्हायरसनं इंटरनेट विश्वात धुमाकूळ घातला होता.

Updated: Mar 5, 2012, 06:31 PM IST

www.24taas.com

 

आता इंटरनेट युजर्ससाठी एक सावधनतेचा इशारा. ८ मार्चपासून तुमची इंटरनेट सिस्टीम बंद पडू शकते. तुम्हाला का असा प्रश्न पडला असेल? तर मग पहा आमचा हा रिपोर्ट.

 

८ मार्चपासून तुमची इंटरनेट सिस्टीम अचानक बंद पडू शकते. डोमेन नेम सिस्टीम चेंजर या व्हायरसची बाधा झाल्यामुळे जगभरातील लक्षावधी युजर्सना ही समस्या भेडसावू शकते. २००७ मध्ये डोमेन नेम सिस्टीम चेंजर या व्हायरसनं इंटरनेट विश्वात धुमाकूळ घातला होता. आणि या प्रतापामागे इस्टोनियातील सायबर चाच्यांची गँग कार्यरत होती.

 

एफबीआयनं नोव्हेंबर २०११ मध्ये या गँगचा पर्दाफाशही केला होता. बनावट डोमेन नेम सिस्टीमच्या माध्यमातून तुमच्या सिस्टीमवर ताबा मिळवणं आणि तिचा हवा तसा वापर करणं यासाठी हा व्हायरस फैलावण्यात आला होता. या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी एफबीआयमार्फत पर्यायी डीएनएसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी केवळ ८ मार्च २०१२ पर्यंतचीच मुदत देण्यात आली होती. मात्र अजूनही लक्षावधी युजर्सच्या सिस्टीम्स डीएनएस चेंजरनं बाधित आहेत. त्यामुळेच ८ मार्चपासून इन्फेक्टेड इंटरनेट सिस्टीम बंद पडणार आहे.

 

एफबीआयच्या वेबसाईटवर या समस्येविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गैरसोय टाळायची असल्यास विशिष्ट प्रकारच्या तंत्रज्ञानामार्फत सिस्टीम २ दिवसांत क्लीन करणं आवश्यक आहे. इंटरनॅशनल सर्विस प्रोव्हायडरनी आपापल्या युजर्सना याबाबतीत जागृत करणं अपेक्षित होतं. पण, तसं झालं नाही. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. गुगल सर्च तसंच एफबीआयच्या वेबसाईटच्या माध्यमातून ही समस्या सहजतेनं सोडवली जाऊ शकते.