www.24taas.com, नवी दिल्ली
रेल्वे प्रवास करताना गाडी उशीरा येणार असेल तर त्याची चिंता करू नका. गाडीला किती वेळ लागेल आणि ती कोणत्या स्थानकादरम्यान आली आहे, याची माहिती तुमच्या मोबाईवर मिळू शकणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला एसएमएस पाठवावा लागणार आहे.
रेल्वेला उशीर झाल्यानंतर प्रवासी बैचेन होतो. गाडी पाहण्यासाठी प्लॅटफॉर्मवर वाकून रेल्वे दिसते का, याची दृश्य अनेक बऱ्याचवेळा स्टेशनवर सहजपणे पाहायला मिळते. ताटकळत बसलेल्या प्रवाशांना रेल्वे कोणत्या स्टेशनवर आहे याची माहिती मिळत नसते. चौकशी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशाला चौकशी खिडकीवर धड उत्तर मिळत नाही. येईल आता, वेळ झाला आहे गाडीला, असे साचेबद्ध उत्तर दिले जाते. मात्र, यातून तुमची सुटका होणार आहे. आता मोबाईलवरच गाडी कुठपर्यंत आली आहे, हे कळणार आहे.
रेल्वेची माहिती मिळण्यासाठी रेल्वेचा गाडी क्रमांक टाईप करा आणि ०९४१५१३९१३९ अथवा ०९६६४१३९१३९ या क्रमांकावर एसएमएस करा. तुम्हाला ती गाडी कुठे आहे याची माहिती मिळेल. हे तंत्रज्ञान रेल्वे आणि आयआयटी कानपूर संस्थेने विकसित केले आहे. इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी तंत्रज्ञान वापरण्यासाठी इस्त्रोकडे रेल्वेने परवानगी मागितली आहे. रेल्वेचा तंत्रज्ञानविषयक विभाग, सीआरआयएस व आयआयटी कानपूरमध्ये लवकरच या प्रकल्पाबाबत सामंजस्य करार होणार आहे. त्यामुळे रेल्वेची माहिती मोबाईलवर मिळणे शक्य झाले आहे.
मोबाइलबरोबरच इंटरनेट असलेल्या लॅपटॉपवरही ही सोय उपलब्ध होईल. तसेच प्रवाशांना ब्रॉडबँड इंटरनेटची सेवा देण्यासह उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे वेळापत्रकाची माहिती देणारे बोर्ड कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहे.
माहिती देण्यासाठी रेल्वे काय करणार?
■ रेल्वेच्या इंजिनावर रिसिव्हर बसविला जाणार आहे. त्यामुळे गाडीचे कोठे आली त्याची माहिती मिळेल
■ उपग्रहाच्या माध्यमातून यंत्रणेचे काम चालेल. यंत्रणेची प्राथमिक चाचणी यशस्वी झाली आहे.
■ प्रकल्पासाठी उपग्रहाची मदत घेण्यास इस्त्रोने ( भारतीय अंतराळ संशोधन संस्था) परवानगी दिली आहे.
■ दिल्लीतील मध्यवर्ती केंद्रात गाड्यांची स्थिती समजेल. जीपीएस तंत्रज्ञानाचाही यासाठी वापर केला जाणार आहे.
ही सेवा ३६ महत्त्वाच्या गाड्यांच्या अप आणि डाऊन मार्गांवर उपलब्ध करण्यात आली आहे. दीड वर्षात सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ही सेवा सुरू होईल. सध्या ही सेवा मुंबई, हावडा, दिब्रुगड राजधानी, दुरांतो आणि भोपाळ, कानपूर तसेच अमृतसर शताब्दी आदी गाड्यांसाठी आहे.