उर्वरित नगरपालिकेसाठी आज मतदान

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या २६ जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीत ७२ उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत. मतदानासाठी शहरात ८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

Updated: Dec 13, 2011, 07:39 AM IST

झी २४ तास वेब टीम, सांगली

 

सांगलीत आज मतदान

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या २६ जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीत ७२ उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत. मतदानासाठी शहरात ८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. यातली ३७ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळपासून मतदानाला धिम्या गतीनं सुरुवात झाली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून इस्लामपूर नगरपालिका ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या ताब्य़ात आहे. या निवडणुकीत काँग्रेस भाजप शेतकरी संघटना आणि आरपीआयनं आघाडी करुन राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण केलं.

 

उस्मानाबादमध्ये आज मतदान

दुसरीकडं उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर आणि परंडा या तीन नगरपालिकांसाठी मतदान होत आहे. उस्मानाबादमध्ये ३३ जागांसाठी १५३ उमेदवार तर तुळजापूरमध्ये १९ जागांसाठी ७४ उमेदवार आणि परंडात १७ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात आहेत. या नगरपालिकांमध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील आणि काँग्रेस नेते आणि पालकमंत्री मधुकर चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 

अमरावतीत आज मतदान

अमरावती जिल्ह्यात अचलपूर, चांदूरबाजार आणि  दर्यापूर या तीन नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान सुरु झालं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला धिम्या गतीनं सुरुवात झाली. दुपारनंतर मतदानाचं प्रमाण वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण ९ नगरपरिषदांच्या निवडणूका होत्या. यातल्या सहा नगरपरिषदांचं मतदान ११ डिसेंबरला झालेलं आहे. तर उर्वरीत ३ नगर परिषदांसाठी आज मतदान होत आहे. या सर्व म्हणजे ९ नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे.