पुणे महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादी आमनेसामने

विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी अर्ज भरल्यानं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Updated: Mar 28, 2012, 10:50 PM IST

www.24taas.com, पुणे

 

विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी अर्ज भरल्यानं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

पुणे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी केली. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या उमेदवारांना मतदान केलं. आघाडीची गाडी अशी वेगात निघालेली असताना अचानक आघाडीच्या गाडीला ब्रेक लागलाय. महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळालंय. त्यामुळं काँग्रेसनं महत्वाच्या अशा शहर सुधारणा समिती अध्यक्षपदावर दावा सांगितलाय. एव्हढचं नाहीतर महिला-बालकल्याण आणि क्रीडा या समितांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष अशा दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज भरुन मोकळे झाले आहेत.

 

शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद मागील दोन वर्षांपासून काँग्रेसकडे आहे. यावेळी या पदासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. पक्षाच्या उमेदवारानं अर्जही भरलाय. तसेच इतर समित्यांच्या अध्यक्षपदासाठी देखील राष्ट्रवादीनं उमेदवार दिलेत. काँग्रेसपेक्षा संख्याबळ दुप्पट असल्यानं एनसीपी मागे हटायला तयार नाही.

 

राज्यात जिल्हा परीषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं काँग्रेसला धक्का दिला होता. पुण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसनं आघाडी धर्म पाळला होता. आठवडाभरातच आघाडीतील हा सुसंवाद मोडीत निघालाय. आता ही आघाडी कोणत्या दिशेने जातेय हे पाहण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल.