पुणे बस प्रवाशांना दाखवतायेत 'कात्रजचा घाट'

पुण्यातल्या हडपसर-कात्रज मार्गाचे जसे १२ वाजलेत तशीच अवस्था या मार्गावर चालवण्यासाठी PMPL ने खरेदी केलेल्या 5 स्टार बसची झाली आहे. 8 कोटींच्या 10 व्हॉल्वो बस धूळ खात पडून आहेत.

Updated: Apr 5, 2012, 10:58 AM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यातल्या हडपसर-कात्रज मार्गाचे जसे १२ वाजलेत तशीच अवस्था या मार्गावर चालवण्यासाठी PMPL ने खरेदी केलेल्या 5 स्टार बसची झाली आहे. 8 कोटींच्या 10 व्हॉल्वो बस धूळ खात पडून आहेत. यातल्या प्रत्येक बसची किंमत 30 लाख आहे तर प्रत्येकी 40 लाख किंमत असेलेल्या टाटाच्या 4 कोटींच्या बसही वाईट अवस्थेत आहेत.

 

PMPL च्या कात्रज डेपोत धूळ खात पडलेल्या बस तब्बल 80 लाख रूपये इतक्या किमंतीच्या आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र ही वस्तुस्थिती आहे. अशी अवस्था असलेली एकच बस नाही. तर, डेपोत व्हॉल्वो कंपनीच्या 80 लाख रूपये किंमतीच्या असेलेल्या आणखी काही बसेस याच अवस्थेत आहेत. त्याचबरोबर टाटा कंपनीच्या स्टार मॉडेलच्या प्रत्येकी 40 लाख रूपये किंमतीच्या बसेसही  भंगारात निघण्याच्या मार्गावर आहेत.

 

पीएमपीएलच्या ताफ्यातल्या 1697 बसेस पैकी तब्बल 35 टक्के म्हणजेच 521 बस बाद आहेत. या साडेपाचशे बस सुरू झाल्यास त्यातून दिवसभरात 5 लाख पुणेकर प्रवास करू शकतील आणि पीएमपीएलला दरदोज 45 लाखांचं अधिक उत्पन्नही मिळू शकेल.

 

पुणेकरांना पीएमपीएलनं प्रवास करणं दिवसेंदिवस जिकरीचं बनत चाललं आहे. त्यातच अशा गलथान कारभारामुळे पीएमपीएल आणखी तोट्यात जाणार हे बसेसच्या अवस्थेवरून  स्पष्ट दिसते आहे. मात्र असं असलं तरी त्याचा दुहेरी भूर्दंड प्रवाशांना बसणार आहे.