पाणी कामगारांना ठेवलं कोंडून...

पुण्यात पाण्याचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. सिंहगड रोडवरच्या काही वसाहतीत पाणी येत नसल्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी थेट पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर धडक मारली.

Updated: Mar 4, 2012, 09:41 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यात पाण्याचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. सिंहगड रोडवरच्या काही वसाहतीत पाणी येत नसल्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी थेट पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर धडक मारली.

 

काही वेळ तिथल्या कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवलं. अधिकारी वर्गालाही धारेवर धरलं. निवडणुका होताच पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलं. एक वेळ पाणीपुरवठ्याचं आश्वासनही पालिकेकडून पूर्ण होऊ शकलं नाही.

 

अनेक भागात आणि वसाहतीत पाणी येत नाही. सिंहगड रोडवरच्या वसाहतीत पाणी येत नसल्यानं संतापलेल्या नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी थेट पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर धडक दिली. पाणीपुरवठा कार्यालय बंद करत कर्मचाऱ्यांना कोंडलं. तब्बल दोन तास हा प्रकार सुरु होता.

 

वरीष्ठ अधिकारीवर्ग पोहचताच संतप्त  नागरिकांनी त्यांनाही धारेवर धरलं. नियोजन नसल्यानेच पाणीसंकट ओढावल्याची टीका भाजपनं केली आहे. तर खासगी टॅंकरवाल्यांचा धंदा वाढावा यासाठीच योग्य पाणीपुरवठा होत नसल्याची पुणेकरांची तक्रार आहे. अधिकाऱ्यांनी सुरळीत पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन दिल्यानंतरच कोंडलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका झाली. नागरिकांच्या संतापामुळे अधिकाऱ्यांनी सुरळीत पाणीपुरवठ्याचं आश्वासन दिलं आहे खरं. पण किती दिवस ते हे आश्नासन पाळतात हे सांगता येणं तसं कठिणच आहे. शहरात अनेक ठिकाणी होत असलेल्या टंचाईवर काय उपाययोजना करायची हाच खरा प्रश्न आहे.

 

 

 

 

Tags: