दुष्काळामुळे साताऱ्यात भीषण परिस्थिती

दुष्काळामुळे सातारा जिल्ह्यातल्या माण-खटावमधील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळं खरीप हंगाम वाया गेला. तर, परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं रब्बी हंगाम देखील हातचा गेला. अशा प्रतिकूल परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी जिद्दीनं डाळिंब, द्राक्षाच्या बागा फुलवल्या. मात्र आता पाण्याविना या बागाही जळू लागल्या आहेत.

Updated: Apr 22, 2012, 10:50 PM IST

www.24taas.com, सातारा

दुष्काळामुळे सातारा जिल्ह्यातल्या माण-खटावमधील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळं खरीप हंगाम वाया गेला. तर, परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं रब्बी हंगाम देखील हातचा गेला. अशा प्रतिकूल परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी जिद्दीनं डाळिंब, द्राक्षाच्या बागा फुलवल्या. मात्र आता पाण्याविना या बागाही जळू लागल्या आहेत.

काळचौंडी...सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील  गाव...माण-खटाव तालुक्याच्या दुष्काळी पट्यात हे गाव  येतं. तरीही इथल्या शिवारात २५० एकराहून अधिक द्राक्ष बागा आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीनं त्या फुलवल्या. मात्र दुष्काळानं त्यांच्या तोंडातला घास हिरावुन घेतलाय. शेतकऱ्यांनी या सुकलेल्या द्राक्ष बागा काढायला सुरवात केलीये. या गावात साधारण २५ वर्षांपासून द्राक्षाची लागवड सुरु झाली. तासगावची बेदाण्याची बाजारपेठ जवळ असल्यानं शेतकरी थेट द्राक्ष न विकता त्याचे बेदाणे तयार करुन ते विकतात. त्यामुळे बेदाण्यांसाठी काळचौंडी गाव प्रसिद्ध झालं. मात्र दुष्काळामुळे शेतकरी हतबल झालाय. पुन्हा द्राक्ष बाग लावण्याच्या मनस्थितीत शेतकरी नाही.

माणिक मानेंची जी व्यथा तीच धनंजय माने या तरुण  शेतक-याची आहे. उच्च  शिक्षित  धनंजयची दीड एकरावर द्राक्ष बाग आहे. मागील काही वर्षांपासून जिद्दीनं त्यानं ही द्राक्ष बाग सांभाळली. दुरून पाणी आणले. ड्रीप एरीगेशन देखील केलंय. कर्ज काढून खते, औषधांसाठी मोठा खर्च केला. मात्र मागील वर्षात बेदाण्यांचा भाव घसरला. अशी प्रतिकूल परीस्थितीतच दुष्काळाचा घाव बसल्यानं शेतक-यांची उरलीसुरली आशाही संपुष्टात आलीये.

मात्र इथल्या शेतकऱ्यांनी हिंमत न हारता मोठ्या कष्टानं डाळिंब, द्राक्षाच्या बागा लावून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र महागाई, कमी बाजारभाव, बागांवरील कीड  आणि पाणीटंचाईपुढं शेतकरी हारला.