झी २४ तास वेब टीम, मुंबई
'झी २४ तास'च्या वतीनं शुक्रवारी कोल्हापूर इंडस्ट्रियल समिटचं आयोजन 2 डिसेंबरला करण्यात आलंय. या समिटमध्ये कोल्हापूरातील उद्योग विकासावर चर्चा केली जाणाराय.
ही इंडस्ट्रियल समिट कोल्हापूर येथील रेसिडेन्सी क्लब, न्यू शाहूपूरी येथे 2 डिसेंबर 2011 रोजी दुपारी 2 वाजता भरणार आहे. एक ऐतिहासिक शहर म्हणून कोल्हापूरची ओळख तर आहेच. शिवाय शेती आणि औद्योगिकीकरणातही कोल्हापूरनं प्रचंड झेप घेतलीय. त्यामुळं पेठांसाठी प्रसिद्ध असणा-या कोल्हापुरात छोट्या अपार्टमेंट्सनंतर मोठ्या अपार्टमेंट्स आल्या आणि आता उभे राहतायत टाऊनशिप प्रोजेक्ट. स्थानिकांबरोबरच बाहेरच्या लोकांनीही शहरातील रिएल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे ऊसालाही चांगला दर मिळू लागल्यानं शेतक-यांनाही कोल्हापुरात घर असावं असं वाटू लागलंय.
इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत इथलं कॉस्ट ऑफ लिव्हींग कमी आहे. नवीन रस्ते, पाणी, वाहतूक व्यवस्था आणि महामार्गावरील शहर या जमेच्या बाजूही आहेतच. शिवाय इथं येणा-या पर्यटकांची संख्या वाढतेय, उद्योगांचा विकास होतोय, आयटी क्षेत्र विस्तारतय. त्यामुळं भविष्यात इथं रिएल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठा वाव आहे. कोल्हापुरातील रिएल इस्टेटची सध्यस्थिती, भविष्य आणि गुंतवणूक संधी यावरील चर्चेसाठी 'झी २४ तास'च्या वतीनं कोल्हापूर इंडस्ट्रीयल समिटचे आयोजन करण्यात आलंय.