झी २४ तास वेब टीम
राज्यात अजूनही उसाचं आंदोलन पेटलेलंच आहे. या प्रश्नी पवारांनी मध्यस्थी करावी, असं म्हणत राजू शेट्टींनी पवारांच्या कोर्टात चेंडू टोलावला. तर शिवसेनाही आंदोलनात उतरली. एकीकडे महाराष्ट्रात हा प्रश्न पेटला असताना, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी उसाला 2800 रुपये भाव दिला. महाराष्ट्र सरकार मात्र उसाच्या प्रश्नावर विविध बैठका घेण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही.
उत्तर प्रदेशात मायावतींनी शेतकऱ्यांना बंपर बोनस देत उसाला 2800 भाव जाहीर केला आणि दुसरीकडे महाराष्ट्रात उसाला 2300 रुपये भाव मिळावा म्हणून संघर्ष पेटला. राज्य सरकार उसाला 1450 रुपये भाव देण्य़ावर ठाम आहे, त्यामुळेच राज्यभरात उसाचं आंदोलन आणखी पेटलं. ऊस दराच्या प्रश्नावर शरद पवारांनी मध्यस्थी केली तर तोडगा निघू शकतो, असं म्हणत राजू शेट्टींनी चेंडू पवारांच्या कोर्टातच ढकलत चांगली खेळी खेळली.
शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर जागं झालेल्या सरकारनं या प्रकरणी राजू शेट्टी यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली. दुसरीकडे शिवसेनेनंही उसाच्या प्रश्नावर आक्रमक होत पेटलेल्या आंदोलनात उडी घेतली. उसाला 2300 रुपये उचल मिळावी आणि कापसालाही सहा हजारांचा भाव मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली.