नाशिकरांना 'लुटतोय रिक्षावाला!'

नाशिकमधली गुन्हेगारी थांबत नाही, तोच आता नाशिककरांचा प्रवासही सुरक्षित राहिलेला नाही. नाशिकच्या रिक्षावाल्यांनी आता प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारणं सुरू केलंय.

Updated: Jun 14, 2012, 09:37 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

नाशिकमधली गुन्हेगारी थांबत नाही, तोच आता नाशिककरांचा प्रवासही सुरक्षित राहिलेला नाही. नाशिकच्या रिक्षावाल्यांनी आता प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारणं सुरू केलंय. त्यामुळे रिक्षातून प्रवास करायचा की नाही, असा प्रश्न नाशिककरांना पडलाय.

 

नाशिकच्या त्रिमूर्ती परिसरात राहणाऱ्या क्षीरसागर दाम्पत्याला नुकताच या गोष्टीचा अनुभव आला. चारधाम यात्रेला जाण्यासाठी गंगाधर क्षीरसागर, त्यांची पत्नी आणि नात सटाण्याहून नाशिकच्या ठक्करबाजार बसस्थानकावर उतरले. तेवढ्यात त्यांच्यासमोर एक रिक्षा आली. आणि रिक्षावाल्यानं त्यांना रिक्षात बसण्याचा आग्रह केला. रिक्षामध्ये आधीच तिघेजण बसले होते. वाटेत रिक्षावाल्यानं पेट्रोल संपल्याचा बहाणा करुन क्षीरसागर कुटुंबीयांना खाली उतरवलं. आणि रिक्षावाला आणि त्याच्या साथीदारांनी क्षीरसागर यांच्याकडचे चाळीस हजार घेऊन पोबारा केला.

 

याआधीही रिक्षाचालकांनी प्रवाश्यांची लूट केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एखाद दोन अपवाद वगळता, अजून कुणालाही अटक नाही. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकावर राज्यभरातून प्रवासी येत असतात. मात्र या ठिकाणी रत्यांवर असलेले दिवे बहुतेकवेळा बंद असतात. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन ब-याचवेळा चोरटे हात साफ करतात. शहरातल्या मुख्य चौकात सीसीटीव्ही बसवण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी वर्षभरापूर्वी केली होती. तीही अजून घोषणाच आहे. अशा परिस्थितीत नाशिककरांना मात्र जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतोय.