www.24taas.com, नाशिक
मान्सून समोर दिसत असला तरी, नाशिककरांसमोर मात्र पाणी टंचाईचं संकट उभं राहिलेलं दिसतंय. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. शहरासाठी फक्त ७५० एमसीएफटी पाणी शिल्लक असल्यानं कमी दाबानं पाणीपुरवठा केला जातोय. अधिकृत घोषणा झालेली नसली तरी शहरात पाणीकपात होतेय. त्यामुळे नाशिककरांचे डोळे लागलेत ते पावसाकडे...
नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २००८ सालीच्या मे माहिन्यात २२६४ एमसीएफटी अर्थात दशलक्ष घनफूट, २००९ मध्ये २००७, २०१० मध्ये २५४५, तर २०११ मध्ये २९८४ पाणी होतं. पण मे २०१२ मध्ये हाच साठा ७२१ इतका खालावलाय. नाशिकचा पाणी प्रश्न किती बिकट आहे, यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. याचमुळे नाशिककरांना कमी दाबानं पाणीपुरवठा होतोय. नाशिकमधली परिस्थिती इतकी गंभीर असताना शहराचा आरक्षित जलसाठा नगर जिल्ह्यासाठी दिल्यानं नाशिककरांमध्ये संताप आहे. आता एक ते दीड कोटी रुपये खर्च करून नवीन चॅनल तयार करावं लागणार आहे. नाही तर ‘दारणा’ धरणावरुन दुप्पट पैसे देऊन पाणी घ्यावं लागणार आहे. ही वेळ आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सेना गटनेत्यांनी केलीय.
पंधरा तारखेपर्यंत मान्सून आला तरी पाणीसाठा वाढवण्यासाठी महिना लागणार आहे. प्रशासनाच्या रामभरोसे कारभारामुळे नाशिककर पुरते वैतागलेत, आता यातून दिलासा देणं पावसाच्याच हातात आहे.
.