झी २४ तास वेब टीम, धुळे
आदिवासी बालकांच्या कुपोषणाबाबत सरकारी यंत्रणेच्या असंवेदनशीलतेचा आणखी एक धक्कादायक प्रकार धुळे जिल्हा रुग्णालयात समोर आला आहे. एका कुपोषित बालकाच्या मृत्युनंतर त्याचं शव घरापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था रुग्णालयानं न केल्यामुळे मातेला मुलाचं शव पदरात घेऊन एस टी स्थानकावर रात्र काढावी लागली. मन हेलावून टाकणाऱ्या या प्रकारावर निर्ढावलेल्या सरकारी यंत्रणेचं उत्तरही संतापजनक आहे.
पदरात सोळा महिन्यांच्या बालकाचा मृतदेह आणि रात्रीच्या अंधारात मुलाच्या आक्रोष करणारे आईवडिल. शहाद्याच्या बस स्थानकावरचं हे दृश्य पाहून कुणाचंही मन हेलावून जाईल. पण सरकारी यंत्रणेच्या पाषाणी ह्दयाला या प्रकारानं पाझर फुटला नाही. कुपोषणामुळे केवळ हाडंच शिल्लक राहिलेल्या अभिजीत पाडवी नावाच्या या बालकाच्या नशिबी मृत्युनंतरही अवहेलना वाट्याला आली ती निर्ढावलेल्या यंत्रणेच्या असंवेदनशील कारभारामुळे.या कुपोषित बालाकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी पालकांची केवळ 300 रुपयांवर बोळवण करून मृतदेह घरी पोहचवण्यास नकार दिला. त्यामुळं रात्रीच्या सुमारास गावी जायला एसटी न मिळाल्यानं या दुर्देवी बालकाच्या मातेला त्याचा मृतदेह मांडीवर घेऊन बस स्थानकावरच रात्र काढावी लागली.
अभिजीत मगर पाडवी या सोळा महिन्यांच्या कुपोषित बालाकाचा धुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र या दुर्दैवी बालकाचा मृतदेह घरी न पोहचवता रुग्णालय प्रशासनानं अभिजीतच्या पालकांची 300 रुपयांवर बोळवण केली. अभिजीतचे आई-वडील आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन धुळ्याहून बसने शहाद्याला गेले. मात्र उशीर झाल्यामुळं शहाद्याहून त्यांना आपल्या गावी जायला गाडी मिळाली नाही. त्यामुळं पोटच्या गोळ्याचा मृतदेह मांडीवर घेऊन या दुदैर्वी आई-वडलांना संपूर्ण रात्र शहाद्याच्या बस स्थानकावर काढावी लागली. अखेर या मातेच्या आक्रोशाकडं एका सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल टाटिया यांचं लक्ष गेलं आणि हा संपूर्ण प्रकार उघड झाला. टाटिया यांनी या अभिजीतचा मृतदेह गावी पोहचवण्याची व्यवस्था केली. कुपोषित मुलाची अवहेलना हे गंभीर कृत्य असून रुग्णालयातल्य दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.