अपुऱ्या पॅकेज विरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक

Updated: Dec 18, 2011, 02:43 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

राज्य सरकारने दिलेले २००० कोटींचे मदतीचे पॅकेज अपूरं असल्याच्या कारणावरुन विदर्भातील शेतकऱ्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसंच प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी मिळणारी १७०० रुपयांची रक्कम नक्षलवाद्यांना दान करण्याची धमकीही दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अर्णीत पाच गावातील २०,००० शेतकऱ्यांनी शनिवारी हा निर्णय घेतला.

 

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांसाठी यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. बेल्लोरा, मंगरुळ, साकूर, बोरगोसावी आणि ब्राह्मणवाडा गावातील शेतकऱ्यांनी कृती समिती स्थापन केली आणि आणि या संबंधीची निर्णय एकमताने घेण्यात आला. पॅकेजचे १७०० रुपये जेंव्हा मिळतील तेंव्हा ते नक्षलवाद्यांना दान करु असं कमिटीचे प्रतिनिधी राजू राऊत यांनी सांगितलं. सरकारने देऊ केलेले पॅकेज अपूरं आहे आणि तोंड देखलं असल्याचं शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी गेले महिनेभर कापसाला ६००० रुपये भाव मिळावा म्हणून उग्र आंदोलन छेडलं होतं.

 

मागच्या बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ७० लाख शेतकऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कापूस, सोयाबीन आणि धान शेतकऱ्यांना पॅकेजची नितांत गरज असल्याचं तसंच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेली दोन वर्षे ६०० कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचं सांगितलं. मागच्या वर्षी कापूस शेतकऱ्यांना सरकारने एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज अतिशय तुटपूंजे असल्याची टीका विरोधी पक्षांनी तसंच विदर्भ जन आंदोलन समितीने केली आहे.