लोडशेडिंगचा शाप, कर्मचाऱ्यांना ताप

राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्याला लोडशेडिंगचा शाप मिळाला आहे. मात्र जनतेच्या रोषाचे धनी वीज मंडळाचे कर्मचारी ठरत आहेत. सामान्य जनता ही हतबल आहे तर चोर सोडून संन्यासाला फाशी का असा प्रश्न विज कर्मचा-यांना पडला आहे.

Updated: Oct 18, 2011, 07:11 AM IST

संदेश सावंत, रत्नागिरी

लोडशेडिंगच्या वणव्यात होरपळणा-या जनतेचा ठिकठिकाणी उद्रेक होतोय. वीज कार्यालयांची तोडफोड, कर्मचा-यांना मारहाणीचे प्रकार घडत आहेत. सरकारच्या नाकर्तेपणाचे बळी मात्र वीज कर्मचारी ठरत आहेत. मारहाणीच्या प्रकारात वाढ झाल्यामुळे वीज कर्मचारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. राज्यभरात लोडशेडिंगविरोधात वणवा पेटला आहे. ठिकठिकाणी महावितरणच्या ऑफिसेसची जाळपोळ, तोडफोड आणि मारहाण सुरु आहे...मात्र  वड्याचं तेल वांग्यावर असाच प्रकार यानिमित्तानं उघड झाला. राज्यातल्या विजेबाबतच्या विदारक परिस्थितीला राज्यकर्ते जबाबदार असताना लोकांच्या उद्रेकाचे बळी मात्र  वीज कर्मचारी ठरताहेत. विशेष म्हणजे ज्या राजकीय नेत्यांमुळं ही परिस्थिती ओढवली त्यांचे स्थानिक कार्यकर्तेही या तोडफोडी आणि मारहाणींमध्ये आघाडीवर आहेत. काहीही चूक नसणारे वीज कर्मचारी  मात्र पुरते त्रासलेत. रत्नागिरीत तर एका वीज कर्मचा-यानं या त्रासाला कंटाळून चक्क राजीनामाच दिला आहे.

राज्यात वीजेची टंचाई असल्यामुळेच लोडशेडिंग होतेय... मात्र स्थानिक अधिका-यांना यासाठी जबाबदार धऱणं चुकीचं असल्याचं अधिका-यांच म्हणणं आहे. राज्यकर्त्यांच्या ढिसाळ कारभारामुळं उफाळलेल्या जनतेच्या या उद्रेकानं वीज कर्मचा-यांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.

राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्याला लोडशेडिंगचा शाप मिळाला आहे. मात्र जनतेच्या रोषाचे धनी वीज मंडळाचे कर्मचारी ठरत आहेत.  सामान्य जनता ही हतबल आहे तर चोर सोडून संन्यासाला फाशी का असा प्रश्न विज कर्मचा-यांना पडला आहे.