राणेंच्या विरोधात सिंधुदुर्गात महायुती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत नारायण राणेंच्या विरोधात सर्व विरोधक एकवटलेत. शिवसेना, भाजप, आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथं महायुती केलीय.

Updated: Dec 8, 2011, 06:24 AM IST

झी २४ तास वेब टीम, सिंधुदुर्ग

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत नारायण राणेंच्या विरोधात सर्व विरोधक एकवटलेत. शिवसेना, भाजप, आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथं महायुती केलीय.

 

शिवसेना आमदार परशुराम उपरकर, भाजप आमदार प्रमोद जठार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला मतदान करू नका असं आवाहन केलं. सिंधुदुर्गातला दहशतवाद मोडून काढण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्रित आल्याचं या नेत्यांनी स्पष्ट केलं.

 

सिंधुदुर्गात वेंगुर्ले इथं राजकीय राडा झाल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज प्रथमच सिंधुदुर्गात गेले आणि नारायण राणेंचं तोंडभरून कौतुक करत त्यांची पाठराखण केली. सावंतवाडीत राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची टक्कर आहे. तिथं मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतली.

 

सिंधुदुर्गात दहशतवाद नाहीच असा दावा करत राणेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं, तर सिंधुदुर्गात काँग्रेसला बदनाम करण्याचा सर्व विरोधकांचा डाव असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी राणेंची पाठराखण केली. अर्थात वेंगुर्लेतल्या राड्याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्यावर बोलणं टाळलं.

 

[jwplayer mediaid="12159"]