जातपडताळणी करायची तर वर्षभर थांबा....

नवी मुंबईतल्या कोकण भवनमध्ये असलेल्या जात पडताळणी कार्यालयात कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या असल्यानं तिथली कामं रखडली आहेत. एका कामासाठी सहा महिने ते एका वर्षाचा कालावधी लागतो आहे. त्यातच कागदपत्रंही गहाळ होत असल्यानं समस्येत आणखीनच भर पडते आहे.

Updated: Apr 1, 2012, 11:38 PM IST

www.24taas.com, नवी मुंबई

नवी मुंबईतल्या कोकण भवनमध्ये असलेल्या जात पडताळणी कार्यालयात कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या असल्यानं तिथली कामं रखडली आहेत. एका कामासाठी सहा महिने ते एका वर्षाचा  कालावधी लागतो आहे. त्यातच कागदपत्रंही गहाळ होत असल्यानं समस्येत आणखीनच भर पडते आहे.

नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये रायगड आणि ठाणे जिल्ह्याचा जात पडताळणी विभाग आहे. या कार्यालयाचा कारभारही सरकारही खाक्याला साजेसा असाच आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, धुळ खात पडलेले फायलींचे ढिग आणि अपूर्ण कामं परिणामी अर्जदारांची लागलेली रिघ हे इथलं चित्र आहे. कागदपत्रं गहाळ झाल्यानं विद्यार्थ्यांचे जातपडताळणी दाखले वर्ष झालं तरी मिळालेली नाही.

अपुरा कर्मचारी वर्ग असल्यानं काम रेंगाळतात. त्यामुळं कामं लवकर करून घ्यायची असतील तर कर्मचारी लाच मागतात. दोन महिन्यांपूर्वीच इथल्या एका कर्मचाऱ्याला लाच-लुचपत विभागानं लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची सात पदं रिक्त आहेत. इतकंच नव्हे तर विभागीय समाजकल्याण अधिकाऱ्याचंही पद रिक्तच आहे. परिणामी कामाला उशीर होत असल्याचं जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. कर्मचारी वर्ग भरण्याविषयी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करूनही रिक्त जागा भरल्या जात नाहीत. परिणामी इथं येणाऱ्या अर्जदारांची गैरसोय सुरूच आहे.