चोर समजून निष्पापांची हत्या

चोर समजून ग्रामस्थांनी दोन इसमांना चोप दिला. ही दुर्घटना बोईसरच्या गुंदले गावात घडली असून ग्रामस्थांनी केलेल्या या हल्ल्यात दोन ड्रायव्हर जागीच ठार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १० ते १२ ग्रामस्थांना ताब्यात घेतलं आहे.

Updated: Jan 6, 2012, 11:14 PM IST

www.24taas.com, बोईसर

 

चोर समजून ग्रामस्थांनी दोन इसमांना चोप दिला. ही दुर्घटना बोईसरच्या गुंदले गावात घडली असून ग्रामस्थांनी केलेल्या या हल्ल्यात दोन ड्रायव्हर जागीच ठार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १० ते १२ ग्रामस्थांना ताब्यात घेतलं आहे. बुधवारी रात्री ९ च्या सुमाराला होंडा सिटी आणि इनोव्हा या दोन गाड्या ग्रामस्थांनी या परिसरात पाहिल्या. या गाडीत चोर आहेत असा इथल्या गावकऱ्यांचा समज झाला. यावेळी ग्रामस्थांनी दांडे, दगड, वीटांच्या साह्यानं गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाडीत असलेले जगत नारायण शुक्ला आणि शर्मा हे दोन्ही ड्रायव्हर मात्र जागीच ठार झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून लहान मुलांना पळवून त्यांची किडनी चोरणारी टोळी कार्यरत असल्याच्या अफवेमुळे गैरसमजातून ही दुर्घटना घडली.

 

 

मुंबईत राहणाऱ्या सुनिल मानिकतला यांचं बोईसर परिसरातल्या पांजरा गावात फार्म हाऊस आहे. त्या फार्महाऊसवर त्यांचा मुलगा काही मित्रांसोबत पार्टीला आला होता. त्यावेळी आणलेल्या तीन गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हर्सपैकी दोन रस्ता विसरले आणि ते या गावात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत १० ते १२ गावकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

 

 

ग्रामस्थांनी कायदा हातात घेतल्यानं यात दोघांना आपला जीव गमवावा लागला. जर ग्रामस्थांनी ते चोर असल्याची खात्री केली असती किंवा पोलिसांना कळवलं असतं तर कदाचित दोघांचे प्राण वाचले असते. आता पोलिस या ग्रामस्थांवर काय कारवाई करतात हे पहाणं महत्त्वाचं ठरेल.