संदेश सावंत, www.24taas.com, रत्नागिरी
मान्सून अगदी तोंडावर येऊन ठेपलाय. कोकणातील मच्छीमारांची मान्सूनपूर्व तयारीसाठी लगबग सुरू झालीय. शासनानं १० जून ते १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीला बंदी घातल्यानं कोकणातील मच्छिमार मान्सूनपूर्व तयारीला लागले आहेत. पावसाळ्यात मच्छीमारी बंद असल्यानं खवय्यांसाठी सुकी मच्छी बाजारात येऊ लागलीय. तर दुसरीकडे मच्छीमारी नौकाही किना-यावर विसावल्या असून नौकांच्या देखभाल दुरूस्तीत मच्छीमार गुंतलेत.
शासनानं १० जून ते १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीला बंदी घातल्यानं कोकणातील मच्छिमार मान्सूनपूर्व तयारीला लागलेत. भरतीची वेळ लक्षात घेऊन मच्छिमार आपल्या नौका किना-यावर शाकारू लागलेत. संपूर्ण किनारपट्टीवर आता हेच चित्र दिसतय. दुसरीकडे पावसाळ्यात मच्छी मिळणार नसल्यानं सुकी मच्छी घेण्यासाठी ग्राहक गर्दी करू लागलेत.
कोकणातील मच्छिमार पावसाळ्यापूर्वी आपल्या नौका किना-यावर लावतात. या नौकांच्या डागडुजीची कामं आता सुरू झालीयेत. याशिवाय मच्छिमार आपल्या जाळ्यांचीही दुरूस्ती करण्यात मग्न आहेत.कोकण किना-यावरील ही सागराची लेकरं आता काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा नव्या जोमानं सागराच्या लाटांवर स्वार होतील आणि मग पुन्हा एकदा कोकणच्या ताज्या माशांची चव खवय्यांना चाखायला मिळेल.