शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवरील इनव्हर्टर

लोड शेडिंगच्या काळोखात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं इनव्हर्टर आता सौर ऊर्जेवर चार्ज करता येणार आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी या विषयी शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं आहे.

Updated: Jan 6, 2012, 05:47 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद

 

लोड शेडिंगच्या काळोखात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं इनव्हर्टर आता सौर ऊर्जेवर चार्ज करता येणार आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी या विषयी शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं आहे.

 

लोडशेडिंगवर मात करण्यासाठी बाजारात विविध कंपन्यांनी इनव्हर्टर आणली आहेत. ग्रामीण भागात इन्हव्हर्टरचा वापर आवश्यक असला तरी पुरेशी वीज नसल्याने इनव्हर्टर चार्ज होत नाही त्यामुळे सौर ऊर्जेवर चार्ज होणाऱ्या इनव्हर्टरचा वापर शेतकऱ्यांना आर्थिकरित्य़ा परवडणारा आहे, असा निष्कर्ष मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्युत आणि ऊर्जा विभागाने काढला आहे.

 

फोटोव्होल्टीक होम लायटिंग सिस्टीममध्ये ८०० वॅटपर्यंत ऊर्जा निर्मिती करणाऱ्या उपकरणाची किंमत १ ते दीड लाख रुपये आहे. तर या यंत्रणेवर घरातील संगणक, टीव्ही, फॅन आणि ट्युब लाईट चालू शकतात. दिवसभर स्वच्छ सुर्यप्रकाशात ही सर्व उपकरणे सौर ऊर्जेद्वारे सुरु राहतात, तर दिवसभर चार्ज झालेल्या बॅटरीच्या आधारावर रात्री ८ तास प्रकाश देऊ शकतात.

 

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मते तीन वर्षात येणाऱ्या बिलाइतकी किंमत या यंत्रणेसाठी लागत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच दर तीन वर्षांनी बॅटरी बदलावी लागणार असून त्याचा ८ ते ९ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी शासनाकडून तीस टक्के सबसिडी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून ४ टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध आहे.