www.24taas.com, नवी दिल्ली
उत्तराखंडमध्ये काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन बंडाळी माजली आहे. उत्तराखंडचे नेते आणि केंद्रीय संसदीय राज्यमंत्री हरिश रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं रावत यांनी राजीनामा दिल्याचं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी विजय बहुगुणा यांच्य़ा नावाची घोषणा झाली आहे.
बहुगुणा यांच्या नावाला रावत यांचा विरोध आहे. या विरोधातूनच त्यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिस्थितीत काम करता येणं अशक्य असल्याचं मत हरिश रावत यांनी व्यक्त केलं आहे. १६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा रावत यांच्या समर्थकांनी केला आहे. दरम्यान नाराज हरीश रावत हे संसद अधिवेशतनात अद्यापही पोहचले नाहीत. हरीश रावत स्वतंत्र पक्ष स्थापन करतील अशी शक्यता आहे.
त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बसपाच्या मदतीनं सरकार स्थापन करणं कठिण होणार आहे. त्यामुळं उत्तराखंडमध्ये हातातोंडाशी आलेली सत्ता गमावण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. त्यामुळे भाजपच्या आशा मात्र पल्लवित झाल्या आहेत.