www.24taas.com, लखनऊ
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी निवडणूक आयोगाच्या पुतळे झाकण्याच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाची कारवाई सरकारच्या दबावाखाली असून हा आदेश म्हणजे दलित विरोधी मोहीम असल्याचं मायावतींनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगानं काँग्रेस आणि रालोदसाठी अशा प्रकारचा आदेश का दिला नाही असा सवाल मायावतींनी उपस्थित केला आहे. हत्ती हे भारतीय संस्कृतीचं प्रतिक आहे. त्याचे पुतळे झाकून निवडणूक आयोगानं एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप मायावतींनी केला आहे.
दरम्यान मायावतींनी पुन्हा सत्तेवर येण्यासाठी सर्व जाती-धर्माची मोट बांधणारा सोशल इंजिनीअरिंगचा फॉर्म्युला अवलंबला आहे. मायावतींनी आपला ५६वा वाढदिवस साधेपणानं साजरा केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातल्या बसपाच्या सर्व ४०३ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अनुसूचित जातीचे ८८, अन्य मागासवर्गीय ११३, मुस्लिमांसह सर्व अल्पसंख्यांक ८५ आणि उच्चवर्गीय यामध्ये ७४ ब्राह्मण उमेदवारांचा समावेश आहे.