www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीतील इस्त्रायली वकिलातीमधील अधिकाऱ्याच्या गाडीत झालेल्या स्फोटाचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेरात टिपले गेले आहे. या चित्रीकरणातून गुन्ह्याचे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, या स्फोटाची चौकशी करण्यासाठी इस्रायलच्या तपास पथकाचे पाच अधिकारी आज राजधानीत दाखल झाले आहेत.
सोमवार, दि १३ फेब्रुवारीला झालेल्या स्फोटात इस्रायली महिलेसह चार जण जखमी झालेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून अवघ्या पाचशे मीटरवर हा स्फोट झाला होता. याबाबत सरकारने लगेचच कोणताही निष्कर्ष काढण्याचे टाळले आहे. इस्रायलने मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हा हल्ला एका प्रशिक्षित दहशतवाद्याकडून करण्याल आला असावा, अशी माहिती गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी दिली.
'हिजबुल्ला' या दहशतवादी संघटनेचा नेता इमाद मुघनिया मृत्युमुखी पडल्याला चार वर्षे झाल्याचे निमित्त साधून हा हल्ला झाल्याचे मानले जात आहे. जॉर्जियातही इस्रायली वकिलातीवर अशाच प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. इस्राईलने आपल्या जगभरातील वकिलातींना दक्षतेचा इशारा दिला आहे.
इस्रायलचे तपास पथक भारतात
इस्रायली वकिलातीमधील अधिकाऱ्याच्या कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात विदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचा आरोप इस्रायली सरकारने केला. बॉम्बस्फोटाची सखोल चौकशी करण्यासाठी 'मोसाद'च्या दोन सदस्यांसह इस्रायलच्या तपास पथकातील पाच सदस्यांचे आज सकाळी दिल्लीत आगमन झाले. त्यांनी स्फोटातील संशयितांची एक यादी भारतीय तपास यंत्रणांना सोपविली आहे.
पाच सदस्यांचे हे पथक तपास कार्यात भारतीय तपास यंत्रणांना मदत करणार आहे. स्फोटात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. या स्फोटामागे विदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचा आरोप इस्रायल सरकारने केला आहे. या स्फोटामागे इराणचा हात असल्याचेही इस्रायलने म्हटले आहे. इराणने मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे.