रतन टाटांनी अवघ्या ४३ वर्षांच्या सायरस मिस्त्रींची निवड आपला वारसदार म्हणून केली आहे. सायरस मिस्त्रींची टाटा सन्सच्या डेप्युटी चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सायरस मिस्त्री रतन टाटांसमवेत एक वर्ष काम करणार आहेत. रतन टाटा निवृत्त झाल्यानंतर डिसेंबर २०१२ मध्ये टाटा सन्सची धुरा सांभाळतील. टाटा सन्स ही टाटा साम्राज्यातल्या सर्व कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे. टाटा सन्सचा अध्यक्ष हा टाटा साम्राज्याचा अधिपती असतो.
सायरस मिस्त्री हे पालनजी शापुरजी मिस्त्रींचे चिरंजीव आहेत. पालनजी शापुरजी मिस्त्रींची ओळख जगातील सर्वात श्रीमंत पारसी अशी आहे. पालनजी शापुरजी मिस्त्रींकडे टाटा सन्सचे १८.५ टक्के समभाग आहेत. सायरस मिस्त्री ऑगस्ट २००६ पासून टाटा सन्सच्या संचालकपदावर आहेत. मिस्त्रींनी लंडनच्या इंपेरिअल कॉलेजमधून सिविल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली तसेच लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापन शास्त्रातील मास्टर्सही पूर्ण केलं आहे. शापुरजी पालनजी तसंच ऍफकॉन्सच्या अध्यक्षपदाची धुरा सध्या सायरस मिस्त्री सांभाळत आहेत. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्या पत्नी आलू टाटा या सायरस मिस्त्रींच्या भगिनी आहेत. सायरस मिस्त्रींनी भारतीय एन्टरटेनमेंट उद्योगात जवळपास दोन दशकांचा अनुभव आहे.