www.24taas.com, नवी दिल्ली
राज्यसभेसाठी नामनियुक्त करण्यात आलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बुधवारी संसदेत शपथ घेणार आहे. तर बॉलिवूडची एवरग्रीन अभिनेत्री रेखा मंगळवारी शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सचिन आणि रेखाला २७ एप्रिल रोजी राज्यसभेसाठी राष्ट्रपतींनी नामनियुक्त केले होते. या दोघांनी दोन आठवडे झाल्यानंतरही दोघांनी शपथ घेतली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नेमणुकीबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. हे दोघेही खासदारकीसाठी गंभीर नसल्याचे म्हटले जात होते.
परंतु, दोघांच्या शपथविधीचा दिवस निश्चित झाल्यामुळे या वादावर पडदा पडला आहे. सचिन सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. उल्लेखनीय म्हणजे सचिनच्या नावाची शिफारस खुद्द कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.
सचिनला १०३ क्रमांकाचे आसन
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्यसभेत १०३ क्रमांकाच्या सीटने आपल्या राजकीय खेळीची सुरूवात करणार आहे. विजय माल्या आणि शेतीशास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्यामधली जागा मास्टर ब्लास्टरला देण्यात आली आहे. दरम्यान, जया बच्चन यांच्या विनंतीनंतर त्यांचा आसन बदलून 91 वरून 143 क्रमांकाचं आसन मिळवला आहे. तर रेखाला 99 क्रमांकाचं आसन मिळाला आहे. त्यामुळे सिलसिला या चित्रपटातील सहकलाकारांचा राज्यसभेत आमना-सामना होण्याची शक्यता मालवली आहे.
जया बच्चन यांनी जागा बदलली
बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांना राज्यसभेत ९९ क्रमांकाची जागा देण्यात आली आहे. ही जागा जया बच्चन यांच्या मागे आहे. म्हणजे पुढील रांगेत ९१ आणि मागील रांगेत ९९ अशी आसान व्यवस्था आहे. त्यामुळे जया बच्चन यांनी रेखा यांच्याशी आमना-सामना टाळण्यासाठी आपला आसन क्रमांक ९१ वरून १४३ करून घेतला आहे. ७० च्या दशकात रेखा आणि जया बच्चन यांचे पती अमिताभ बच्चन यांच्या रोमान्सच्या अफवा उठल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा उकरून कोणी काढू नये, यासाठी जया बच्चन यांनी हा बदल करून घेतल्याचे समजते आहे.