राष्ट्रपती प्रणवदा भ्रष्टाचारी - टीम अण्णा

देशाचे नवनियुक्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप टीम अण्णांनी केला आहे. मुखर्जी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असून २५ जुलैला ते सर्वासमक्ष जाहीर करणार असल्याचं टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Updated: Jul 23, 2012, 09:15 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

देशाचे नवनियुक्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप टीम अण्णांनी केला आहे. मुखर्जी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असून २५  जुलैला ते सर्वासमक्ष जाहीर करणार असल्याचं टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

२५ जुलैला नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा शपथविधी होणार आहे. त्याच दिवसापासून सरकारविरोधात आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय. दिल्लीत आयोजित एका रॅलीत टीम अण्णा सदस्य आणि प्रशांत भूषण यांनी प्रणव मुखर्जी, पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्यासह युपीएच्या मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

याआधी प्रत्येक आंदोलनावेळी आश्वासनांवर सरकारनं बोळवण केली. मात्र २५ जुलैपासून सुरु होणारी लढाई आरपारची लढाई असेल असंही केजरीवाल यांनी म्हटलंय.. यावेळी सरकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नसून हे निर्णायक आंदोलन असेल असंही त्यांनी सांगितलं. शिवाय टीम अण्णांविरोधात बुलंदशहर कोर्टात सुरु असलेल्या खटल्यासाठी हजेरी लावून आपली बाजू मांडणार असल्याचंही केजरीवालांनी सांगितलंय.