येडियुरप्पांपाठोपाठ मोदी लक्ष्य

कॉंग्रेसने गुजरातेतील मोदी सरकारलाही भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावरून लक्ष्य केले आहे. मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने आंदोलन सुरू केले आहे.

Updated: Oct 9, 2011, 12:20 PM IST

[caption id="attachment_264" align="alignleft" width="300" caption="मुख्यमंत्री नरेंद्र मोदी"][/caption]

झी 24 तास वेब टीम

 

कर्नाटकात भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावरून भाजपच्या येडियुरप्पा यांना अखेर पदावरून दूर व्हावे लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता कॉंग्रेसने गुजरातेतील मोदी सरकारलाही भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावरून लक्ष्य केले आहे. मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. मोदींच्या सरकारने प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे व त्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

 

राज्याच्या वेगवेगळ्या भागांत प्रचारसभा, बैठकी, मोर्चे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध सतरा प्रकरणांमध्ये मोदी सरकारने गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेस समितीने केला असून, त्याच्या म्हणण्यानुसार, त्याची व्याप्ती जवळजवळ एक लाख कोटी रुपयांची आहे.

 

या भ्रष्टाचारासंबंधीची कागदपत्रे राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि गुजरातच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांना सादरही करण्यात आली आहेत. याशिवाय भ्रष्टाचाराच्या प्रश्‍नावर मोदी सरकारवर झोड उठविण्यासाठी व जनजागृतीसाठी "जनमंगल यात्रे'चे आयोजन करण्यात आले आहे. घेरा सोमनाथ ते सोमनाथ मंदिर या मार्गाने ही यात्रा जाणार आहे.

 

गैरव्यवहाराच्या प्रकरणात कच्छ भागात अदानी उद्योगसमूहाला जी जमीन सरकारने दिली आहे, त्या विषयाचाही समावेश आहे. पर्यावरण मंत्रालयही या व्यवहाराची चौकशी करणार असल्याचे त्या खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. आठ ऑगस्टला ही चौकशी करण्यात येईल. ही जमीन अद्यापही सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात आहे. राज्य सरकारकडून अदानी समूहाने ती विकत घेतली. केवळ दोन कोटी रुपयांना हा व्यवहार झाला. एका सार्वजनिक हितार्थ याचिकेच्या माध्यमातून हा विषय धसास लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेच; परंतु कॉंग्रेसने राजकीय पातळीवरही त्यावरून रान उठविण्याचे ठरविले आहे.

 

"जनलोकपाला'च्या मागणीसाठी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या भाजपची गुजरातेत मात्र वेगळी भूमिका आहे, यावरही गुजरात प्रदेश कॉंग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. गुजरातेतही लोकायुक्ताची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी आहे; परंतु अद्याप त्या दिशेने काही झालेले नाही. कर्नाटकात येडियुरप्पा यांना ज्या पद्धतीने जावे लागले, त्याच पद्धतीने गुजरातेत मोदी यांना जावे लागेल, असे सूचित करून प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अर्जुन मोशवादिया यांनी या राज्यातही खाणींमध्ये मोठ्या प्रमाणावर लूट चालू असल्याचा आरोप केला आहे.