www.24taas.com, रायपूर
छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंग यांनी एक विचित्र वक्तव्य केलं आहे. रमण सिंग यांचं म्हणणं आहे की मुलाच्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या वडिलांना देण्यात यावी. रणण सिंग यांच्या मते मुलाच्या गुन्ह्याचे खरे अपराधी वडील असतात. त्यामुळे मुलाने गुन्हा केला तर शिक्षा मुलाला नव्हे, तर वडिलांना देण्यात यावी.
रमण सिंग यांच्या असा वक्तव्यामागे त्यांनी एक तर्कही दिला आहे. मुलामध्ये येणारे गुण हे त्याच्या वडिलांकडून येत असतात. त्यामुळे जर कुठला मुलगा चोरी करत असेल, दरोडे घालत असेल, बलात्कार करत असेल, तर ती चूक त्या मुलाची नसून त्या मुलात ज्या माणसाचं रक्त आहे, त्या बापाचा दोष आहे.
रमण सिंग यांनी यापुढे जाऊन आपला विज्ञानवादी दृष्टिकोन दाखवत वक्तव्य केलं आहे, “आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की आपण आपल्याला हवी असेल, तशी संतती जन्माला घालू शकतो. लवकरच असा दिवस येईल जेव्हा स्टेम सेल्सच्या मदतीने हजारो ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन जन्माला घातले जातील.” रायपूर येथे झालेल्या छत्तीसगढ सायंस सेंटरच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी अशी विचित्र विधानं केली .