देशाची सुरक्षा धोक्यात- लष्करप्रमुख

लष्कर प्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांनी आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता हे विधान करुन खळबळ उडवून दिली असतानाच त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावरुन गदारोळ माजला आहे. देशाचं संरक्षण करण्यास आपण सज्ज नसल्याचं त्यांनी पत्रात लिहिल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी गदारोळ केला आहे. हवाई दलाकडे असलेली ९७ टक्के शस्त्रअस्त्रा निकामी असल्याचं तसंच रणगाड्यांमध्ये दारुगोळा नसल्याचं आणि इनफ्रंट्रीला आवश्यक असणारी शस्त्र उपलब्ध नसल्याचं लष्कर प्रमुखांनी पत्रात लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

Updated: Mar 28, 2012, 11:38 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

लष्कर प्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांनी आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता हे विधान करुन खळबळ उडवून दिली असतानाच त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावरुन गदारोळ माजला आहे.

 

देशाचं संरक्षण करण्यास आपण सज्ज नसल्याचं त्यांनी पत्रात लिहिल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी गदारोळ केला आहे. हवाई दलाकडे असलेली ९७ टक्के शस्त्रअस्त्र निकामी असल्याचं तसंच रणगाड्यांमध्ये दारुगोळा नसल्याचं आणि इनफ्रंट्रीला आवश्यक असणारी शस्त्र उपलब्ध नसल्याचं लष्कर प्रमुखांनी पत्रात लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

देशाच्या संरक्षणसज्जतेत असलेल्या त्रुटींमुळे १३ लाख सैन्य असलेल्या सेनादलाच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचं लष्करप्रमुखांनी म्हटलं आहे. तोफखाना, हवाईदल, पायदळ आणि विशेष दलं तसंच यांत्रिकी दलं यांची अवस्था चिंताजनक असल्याचंही जनरल सिंग यांनी पत्रात लिहिलं आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित तज्ञ आणि निरिक्षकांनी मनमोहन सिंग यांनी दोन वेळा पंतप्रधानपदी आल्यानंतर संरक्षण खात्याला आवश्यक असणाऱ्या शस्त्रसामुग्रीची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली नसल्याने टीका केली आहे.

 

संरक्षण खात्याचे राज्यमंत्री पल्लम राजू यांनी लष्करप्रमुखांकडून पत्र मिळालं असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे आणि त्यावर गांभीर्याने विचार करत असल्याचं म्हटलं आहे. सेनादलाच्या सज्जतेतील उणीवा भरून काढण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सज्जतेत असलेल्या उणीवा भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगत मंत्र्यांनी एक प्रकारे सिंग यांचे म्हणणं बरोबर असल्याला पुष्टी दिली आहे.