'काँग्रेसच्या समस्येला भाजप हेच उत्तर'

काँग्रेसने निर्माण केलेल्या समस्यांवर भाजप हे उत्तर आहे, असं म्हणणं आहे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांचं. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मुंबईत आजपासून सुरू झालीय.

Updated: May 24, 2012, 05:26 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

देशात काँग्रेस ही एक समस्या आहे, आणि या समस्येचं उत्तर भाजप आहे, असा अक्रमक पवित्रा भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतलाय. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठक मुंबईत आजपासून सुरू झालीय.

 

पेट्रोल दरवाढीनंतर संपूर्ण देशभरात सरकारविरोधात असलेल्या संतापाच्या लाटेचा फायदा घेण्याचं भाजपनं ठरवलेलं दिसतय. २०१४ लोकसभा निवडणुकांचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झालीय. भाजपच्या मतदारांमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली पाहिजे, तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विस्ताराचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी उद्घाटनाच्या भाषणात म्हटलंय.  भाजपने आता आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक या समाजातील घटकांमध्ये प्रचार करण्याची आवश्यकता असल्याचं गडकरींनी सांगितलं. देशाचा राष्ट्रपती एखाद्या घराणाशी संबंधित नको, तर देशाचा सन्मान वाढवणारा  हवा, असं सांगत त्यांनी राष्ट्रपतीपदाबाबतची भूमिकाही स्पष्ट केलीय. तसचं संजय जोशी यांच्या राजीनामा प्रकरणावर पडदा टाकताना जोशी यांनी पक्षाच्या हिताकरता राजीनामा दिल्याचा दावा केलाय. तसचं नरेंद्र मोदी हे कार्यकारिणीच्या बैठकीला हजर राहणार असून आता कुठलाही वाद राहिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपचे २०२५ सालचे व्हिजन डॉक्युमेटेंशन २५  सप्टेंबर २०१२ साली प्रकाशित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

 

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आजपासून मुंबईत बैठक सुरू झाली. नरिमन पॉईन्टच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक पार पडली. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंग, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, जसवंत सिंग, अरूण जेटली हे नेते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी हजर होते.