www.24taas.com, नवी दिल्ली
राष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जींची सर्वसंमतीनं निवड होणार की नाही याबाबतचं चित्र आजही स्पष्ट होऊ शकलं नाही. या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी एनडीएनं बोलावलेली बैठक आज कोणताही निर्णय न होताच संपली. त्यातच या बैठकीकडे शिवसेनेनं पाठ फिरवल्यानं उमेदवारावरून एनडीएमध्ये मतभेद असल्याचं चित्र समोर आलं.
एनडीएच्या बैठकीनंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल ही अपेक्षा अखेर फोल ठरली. बैठक सुरू होण्याआधीच शिवसेना उपस्थित राहणार नाही हे स्पष्ट झालं होतं. एपीजे अब्दुल कलाम उमेदवार असतील तर ठीक अन्यथा संगमा किंवा अन्य उमेदवारांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे एनडीएच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता वाढली. लालकृष्ण अडवाणींच्या निवासस्थानी झालेल्या एनडीएच्या बैठकीत तब्बल दोन तास खल होऊनही राष्ट्रपती उमेदवाराबाबत कोणताच निर्णय होऊ शकला नाही.
शिवसेनेचा विरोध असला तरी पी. ए. संगमांच्या उमेदवारीसाठी एनडीएचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी तृणमूलच्या ममता बॅनर्जी, एआयएडीएमकेचे जयललिता आणि बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांच्याशी एनडीएचे नेते चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली... प्रणवदांना सर्वसंमतीचे उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याच्या बदल्यात उपराष्ट्रपतीपद पदरात पाडून घेण्याचा एनडीएचा प्रयत्न असल्याचं बोललं जात होतं. पण बैठकीत त्यावर चर्चा झाली नाही असं सांगण्यात आलं. एकूणच एनडीएची राष्ट्रपती निवडणुकीतली तळ्यात-मळ्यात भूमिका बैठकीनंतरही कायम राहिली. शिवसेनेच्या भूमिकेनं उमेदवारीवरून मतभेदही समोर आले आणि राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार की नाही हे चित्रंही स्पष्ट होऊ शकले नाही.